5.4 हजार कोटी रुपयांचा शस्त्रास्त्र व्यवहार
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
इस्रायल-पॅलेस्टाईन यांच्यातील सद्यकालीन संघर्षादरम्यान अमेरिकेच्या जो बायडेन प्रशासनाने इस्रायलला 73.5 कोटी डॉलर्स म्हणजेच 5.4 हजार कोटी रुपयांच्या शस्त्रास्त्रविक्रीला मंजुरी दिली आहे. बायडेन यांच्या या निर्णयावर डेमोक्रेट्स खासदारांनीच प्रश्न उपस्थित केले आहेत. या खासदारांनी इस्रायलचे समर्थन करणाऱया अमेरिकेच्या नेतृत्वावरही सवाल उपस्थित केले आहेत. बायडेन प्रशासन सातत्याने इस्रायलचा बचाव करत आहे. अमेरिकेने रविवारी संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेत इस्रायल-पॅलेस्टाइन संघर्षावर तिसऱयांदा विधान प्रसिद्ध करण्यापासून रोखले आहे.
पॅलेस्टाईनमधील उग्रवादी संघटना हमासच्या रॉकेट हल्ल्यात आणि इस्रायलच्या प्रत्युत्तरादाखलच्या कारवाईत 200 हून अधिक जणांना जीव गमवावा लागला आहे. बायडेन प्रशासनाने प्रारंभी त्वरित शस्त्रसंधीचे आवाहन करण्यास चालढकल केली आणि इस्रायलला हमासच्या विरोधात स्वतःचा बचाव करण्याचा अधिकार असल्याची भूमिका घेतली. अमेरिकेच्या प्रशासनाच्या या भूमिकेला काँग्रेसच्या बहुतांश सदस्यांचे समर्थन होते.
प्रस्तावित संरक्षण व्यवहारात जॉइंट डायरेक्ट अटॅक म्युनिशन किंवा जेडीएएमएस किटमध्ये अचूक मारा करणाऱया क्षेपणास्त्रांसारखे बॉम्ब सामील आहेत. इस्रायलने यापूर्वीही अमेरिकेकडून अशाप्रकारचे बॉम्ब खरेदी केले आहेत. हमासच्या रॉकेट हल्ल्यांपासून नागरिकांचे रक्षण करण्यासाठी हा बॉम्ब खरेदी कर असल्याचा इस्रायलचा दावा आहे. हमास गाझा पट्टीत स्वतःच्या बचावाकरता लोकांना स्वतःची ढाल म्हणून वापरत असल्याचा आरोप इस्रायलने केला आहे.
इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील संघर्ष आता पाण्यातही सुरू झाला आहे. हमासने रिमोटने संचालित पाणबुडीद्वारे सागरी मार्गाने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा इस्रायलने केला आहे. तर प्रत्युत्तरादाखल इस्रायलने केलेल्या कारवाईत हमासचे अनेक सदस्य मारले गेले आहेत. लेबनॉनमधून 6 रॉकेट डागण्यात आल्याचे इस्रायलकडून सांगण्यात आले. पण हे सर्व रॉकेट्स लेबनॉनच्या हद्दीतच कोसळले आहेत.









