कुवेतकडून 31 देशांसाठीची विमानसेवा स्थगित : जगभरात आतापर्यंत 1 कोटी 80 लाख 50 हजार 589 कोरोनाबाधित
जगभरात कोरोना विषाणूची लागण आतापर्यंत 1 कोटी 80 लाख 50 हजार 589 जणांना झाली आहे. यातील 1 कोटी 13 लाख 47 हजार 120 बाधितांना संसर्गापासून मुक्ती मिळाली आहे. तर 6 लाख 89 हजार 462 रुग्णांचा मृत्यू ओढवला आहे. इस्रायलमध्ये जेरूसलेमचे मंत्री कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. मंत्री राफी पेरेट्ज यांनी स्वतः ट्विट करत याची माहिती दिली आहे. पेरेट्ज यांच्यापूर्वी माजी आरोग्यमंत्री याकोव्ह लिजमॅन यांनाही कोरोनाची लागण झाली होती. पेरेट्ज हे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांच्या संपर्कात आले होते की नाही हे जाणून घेण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. तर कुवेतने 31 देशांमधून येणाऱया आंतरराष्ट्रीय विमानोड्डाणांवर बंदी घातली आहे. या देशांमध्ये इराण, चीन, लेबनॉन, स्पेन, सिंगापूर, इजिप्त, श्रीलंका इत्यादींचा समावेश आहे.
इस्रायलमध्ये निदर्शने
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांच्या निवासस्थानाबाहेर 10 हजारांपेक्षा अधिक जणांनी निदर्शने केली आहेत. नेतान्याहू यांच्या राजीनाम्याची मागणी निदर्शकांनी केली आहे. महामारीमुळे उद्योगधंद्यावर पडलेल्या प्रभावामुळे नाराज होत लोकांनी अन्य ठिकाणीही निदर्शने केली आहेत. सर्वात मोठे निदर्शन राजधानी जेरूसलेममध्ये झाले आहे. शनिवारी रात्री झालेल्या निदर्शनासाठी इस्रायल पोलिसांनी अनुमती दिली होती.
इटलीत बरे होणाऱयांचे प्रमाण

इटलीत संसर्गमुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 2 लाख 229 वर पोहोचली आहे. देशात 12 हजार 500 सक्रीय रुग्ण आहेत. यातील केवळ 43 रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत. इटलीत आतापर्यंत 35 हजार 146 जणांचा मृत्यू ओढवला आहे. तेथे जुलैपासून प्रतिदिन 200 ते 300 बाधित आढळून येत आहेत.तेथे 31 जानेवारीला आणीबाणी घोषित करण्यात आली होती.
चीनमध्ये महामारीचे अस्तित्व

कोरोना विषाणूचा संसर्ग चीनच्या वुहान शहरातूनच जगभरात पसरला होता. हा विषाणू अद्याप चीनमध्ये ठाण मांडून आहे. देशात कोरोनाचे बाधित अद्याप सापडत आहेत. रविवारी 49 नवे रुग्ण सापडले आहेत. तर 14 कोरोनाबाधितांना संसर्गापासून मुक्तता मिळाली आहे. 49 नव्या रुग्णांपैकी 33 स्थानिक असून उर्वरित विदेशातून आलेले आहेत. बहुतांश रुग्ण शिनजियांग प्रांतात आढळून आले आहेत. रुग्णांची एकूण संख्या आता 84,385 झाली आहे.
कॅलिफोर्निया : 5 लाख रुग्ण

कॅलिफोर्निया कोरोनाचे 5 लाखांहून अधिक रुग्ण असणारा अमेरिकेतील पहिला प्रांत ठरला आहे. प्रांतात दिवसभरात 6,542 नवे रुग्ण सापडल्याने एकूण संख्या 5 लाख 130 झाल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे. प्रांतात आतापर्यंत 9,224 जणांना जीव गमवावा लागला आहे. मागील 24 तासांमध्ये 75 हजार 546 जणांचे स्वॅब तपासले गेले आहेत. राज्यात आतापर्यंत 78 लाख 86 हजार 587 जणांची चाचणी झाली आहे. रुग्णसंख्येप्रकरणी कॅलिफोर्नियाने न्यूयॉर्क प्रांताला मागे टाकले आहे.
मेक्सिकोत रुग्ण वाढतेच

मेक्सिकोत दिवसभरात 9,556 नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. एका दिवसात आढळून येणाऱया रुग्णांचा हा उच्चांकी आकडा आहे. एक दिवसापूर्वी तेथे 8,458 रुग्ण सापडले होते. देशात आतापर्यंत 4 लाख 34 हजार 193 जणांना बाधा झाली आहे. तर बळींप्रकरणी मेक्सिको तिसऱया स्थानावर पोहोचला आहे.
दक्षिण आफ्रिका : 5 लाख रुग्ण
दक्षिण आफ्रिकेत कोरोना रुग्णांचे प्रमाण 5 लाख 3 हजार 290 वर पोहोचल्याची माहिती आरोग्यमंत्री जवेली मखाइजे यांनी दिली आहे. देशातील एक तृतीयांश रुग्ण गाउटेंग प्रांतात आढळले आहेत. शहरी भागात संसर्ग अधिक पसरला आहे. हा संसर्ग ग्रामीण भागात पसरू नये याकरता खबरदारी घेतली जाणे आवश्यक ठरले आहे.
71 टक्के पालक शाळा सुरू करण्याच्या विरोधात
अमेरिकेतील कोरोना संकटाचा परिणाम : इस्रायलमध्ये शाळा पुन्हा बंद

कोरोना महामारीने सर्वाधिक ग्रस्त अमेरिकेत शाळा सुरू करण्यासंबंधी चर्चा सुरू आहे. पण, बहुतांश पालक सद्यकाळात शाळा सुरू करण्याच्या मताचे नाहीत. क्विनीपिएक विद्यापीठाच्या जुलैमधील सर्वेक्षणात 62 टक्के लोकांनी सद्यस्थितीत शाळा सुरू करणे असुरक्षित असल्याचे मत व्यक्त केले आहे. तर एक्सिओस/इपसॉसच्या सर्वेक्षणात 71 टक्के पालकांनी मुलांना शाळेत पाठविणे जोखिमीचे असल्याचे नमूद पेले आहे. शिक्षक आणि अन्य कर्मचाऱयांच्या माध्यमातून मुलांना संसर्ग होऊ शकतो. स्कुल सुपिरेटेंडेंट असोसिएशननुसार शाळा परिसरात मास्क, स्वच्छता, परिचारिका, निजंर्तुंकीकरणासाठी सुमारे 13 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.
सप्टेंबरमध्ये शाळा सुरू होणार
अनेक जिल्हय़ांमध्ये सप्टेंबर महिन्यात शाळा सुरू करण्याची घोषणा अमेरिकेत करण्यात आली आहे. सद्यस्थितीत मुलांनी शाळेत येऊ नये असे मत पालकांसह शिक्षकांनीही व्यक्त केले आहे. तर असुरक्षित वर्गांमध्ये परतणार नसल्याचे शिक्षक संघटनांनी म्हटले आहे. पुरेशा सुरक्षा व्यवस्थेसह शाळा सुरू करण्याच्या बाजूने आहोत अशी भूमिका अमेरिकेच्या शिक्षक फेडरेशनच्या प्रमुख रेंडी वीनगार्टन यांनी मांडली आहे.
20 टक्के लोकांचा पाठिंबा
प्रोगेसिव्ह नेवीगेटर प्रोजेक्टने केलेल्या सर्वेक्षणात केवळ 20 टक्के लोकांनी शाळा पूर्णपणे सुरू करण्यास पाठिंबा दर्शविला आहे. विषाणूमुळे सर्वाधिक प्रभाव अश्वेतांवर पडला आहे. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये मुलांना शाळेत पाठविण्याची तयारी केवळ 34 टक्के श्वेतवर्णीय तर 19 टक्के अश्वेतवर्णीय पालकांनी दर्शविली आहे.
ट्रम्प यांचे समर्थन
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकदा शाळा सुरू करण्यास समर्थन दर्शविले आहे. शाळा सुरू केल्या जाव्यात असे त्यांनी म्हटले आहे.
प्रायोगिक तत्वावर प्रारंभ
? अमेरिकेच्या काही जिल्हय़ांमध्ये मागील महिन्यात प्रायोगिक तत्वावर शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. मिडिलटाउन जिल्हय़ात तापमान तपासल्यावर मुलांना येऊ दिले जाते.
? शाळांच्या डेस्कवर प्लास्टिक शील्ड लावण्यात आले आहे. कार्टून फलकांद्वारे मुलांना मास्क परिधान करण्याचा आणि बचावाच्या पद्धती अवलंबिण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
? विद्यार्थी आठवडय़ातील 4 दिवस विविध गटांमध्ये शाळेत येतात. उर्वरित मुलांना ऑनलाईन शिक्षण प्राप्त हेते. काही ठिकाणी शिक्षक कुटुंबांच्या गटाला 6 हजार रुपये प्रतितास शुल्कासह ऑनलाईन शिक्षण प्रदान करत आहेत.
? एप्रिल महिन्यात शाळा सुरू करणारा डेन्मार्क हा पहिला पाश्चिमात्य देश ठरला होता. परंतु धोका असल्याने तेथील शिक्षक घरातूनच शिकवत आहेत.
? फिनलँड, नॉर्वे, जर्मनीनेही शाळा सुरू करण्याचे पाऊल उचलले आहे. जपान, सिंगापूर, दक्षिण कोरियात शाळा सुरू झाल्या आहेत. तेथे कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यात आले आहे.
? इस्रायलमध्ये खबरदारी न घेता मे महिन्यात शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. जूनमध्ये संसर्ग वेगाने फैलावल्यावर शाळा बंद करण्यात आल्या. हजारो मुलांना आणि शिक्षकांना विलगीकरणात जावे लागले.









