आघाडीतील घटक पक्षाचा पंतप्रधानांवर आरोप : संसदेत सरकार विरोधात करणार मतदान
वृत्तसंस्था / जेरूसलेम
इस्रायलमधील पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांचे आघाडी सरकार संकटात सापडले आहे. आघाडीतील सहकारी बेनी गेंट्ज यांनी नेतान्याहू यांच्यावर आश्वासनांची पूर्तता न केल्याचा आरोप केला आहे. संसदेत सरकारच्या विरोधात मतदान करणार आहोत. देशात नव्याने निवडणूक घेणेच योग्य ठरणार असल्याचे बेनी गेंट्ज यांनी यावेळी म्हटले आहे.
बेंजामीन यांच्यासाठी ही घडामोड अत्यंत आव्हानात्मक ठरणार आहे. त्यांच्यावर यापूर्वीच भ्रष्टाचाराचे आरोप झाले असून मागील वेळी तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर त्यांना सरकार स्थापन करता आले होते.
सरकार स्थापन झाल्यापासून नेतान्याहू यांनी आघाडीने दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततकेडे डोळेझाक केली आहे. अशीच स्थिती राहिल्यास एकत्रित वाटचाल अशक्य होईल. आपला नेता काय करतोय हे आघाडीतील घटकपक्षांना कळायला हवे असे उद्गार गेंट्ज यांनी काढले आहेत. गेंट्ज देशाचे संरक्षणमंत्री असून सरकार त्वरित पाडण्याची इच्छा नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पुढे काय घडणार?
नेतान्याहू आणि गेंट्ज यांनी परस्परांमधील मतभेद दूर केल्यास सरकार कायम राहू शकते. अन्यथा सरकार कोसळून नव्याने निवडणूक घ्यावी लागणार आहे. असे घडल्यास देशात दोन वर्षांमध्ये चौथ्यांदा नागरिक नव्या सरकारसाठी मतदान करतील. सरकार आणि आघाडी वाचविण्याची जबाबदारी नेतान्याहू यांचीच असल्याचे विधान गेंट्ज यांनी केले आहे.
मे महिन्यात सरकार स्थापन
नेतान्याहू हे लिकुड पार्टीचे अध्यक्ष आहेत. गेट्ज ब्ल्यू अँड व्हाइट पार्टीचे नेते आहेत. मे महिन्यात दोन्ही पक्षांनी एका सामायिक कार्यक्रमाद्वारे सरकार स्थापन करण्यावर सहमती दर्शविली होती. तसेच कराराच्या अंतर्गत नेतान्याहू पहिले 18 महिने पंतप्रधान राहणार होते. पुढील 18 महिन्यांसाठी गेंट्ज यांना पंतप्रधानपद मिळणार होते. सरकार स्थापन झाल्यापासूनच दोन्ही पक्षांमध्ये अनेक मतभेद निर्माण झाले होते.









