संयुक्त अरब अमिरातचे 48 वर्षांनी पाऊल : शत्रुत्वापासून मैत्रीपर्यंतचा प्रवास
वृत्तसंस्था/ अबु धावी
इस्रायल आणि संयुक्त अरब अमिरात (युएई) यांचे नवे मैत्रीसंबंध गतिमान होऊ लागले आहेत. इस्रायलवर बहिष्कार टाकण्यासाठी लागू करण्यात आलेला 48 वर्षांपूर्वीचा कायदा युएईने संपुष्टात आणला आहे. याकरता युएईचे प्रमुख शासक खलिफा बिन जायेए अल नाहयान यांनी आदेश काढला आहे.
द्विपक्षीय संबंधांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. इस्रायल आणि अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱयांचे एक शिष्टमंडळ अबु धाबी येथे पोहोचणार आहे. या शिष्टमंडळ आणि युएईच्या अधिकाऱयांमध्ये अनेक टप्प्यांमध्ये चर्चा होणार आहे. इस्रायल आणि युएई यांच्यात महत्त्वाचा व्यापार करार होणार असल्याचे मानले जात आहे.
ट्रम्प यांची भूमिका
इस्रायल आणि अमेरिकेचे शिष्टमंडळ सोमवारी सकाळी 10 वाजता तेल अवीव येथून अबु धाबीसाठी रवाना होणार आहे. या शिष्टमंडळात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ढ ट्रम्प यांचे विशेष सल्लागार जेरेड कुशनर सामील आहेत. त्यांच्यासह इस्रायल आणि अमेरिकेचे आर्थिक तसेच सैन्य विषयक वरिष्ठ अधिकारी त्यात आहेत.
अनेक करार शक्य
युएई आणि इस्रायल लवकरच परस्परांच्या देशात दूतावास सुरू करणार आहेत. या दूतावासांमुळे राजनयिक संबंधांची औपचारिक सुरुवात होणार आहे. व्यापारी संबंधांसाठी काही महत्त्वाचे करार होऊ शकतात. इस्रायल अमेरिकेच्या धर्तीवर युएईला व्यापारी भागीदाराचा दर्जा देऊ शकतो. युएईला इराणपासून धोका आहे. या धोक्याला हाताळण्यासाठी इस्रायल युएईला मोठी मदत करू शकतो. त्यामुळे सोमवारी एखाद्या सैन्य कराराचीही शक्यता आहे.
व्यापाराला चालना
युएईचे व्यावसायिक आता थेट इस्रायलच्या कंपन्यांशी व्यापारी संबंध प्रस्थापित करू शकतात. इस्रायली उत्पादने कुठल्याही अडथळय़ाशिवाय युएईच्या बाजारपेठेत विकली जाऊ शकतील. दोन्ही देश 20 वर्षांपासून बॅकडोअर डिप्लोमसीच्या माध्यमातून संपर्कात होते. अमेरिका यात एकप्रकारे मध्यस्थी करत होती. काही वर्षांमध्येच दोन्ही देशांमधील व्यापार 15 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचू शकतो. युएईला वाळवंटात शेती आणि खारे पाणी पिण्यायोग्य करण्याचे तंत्रज्ञान इस्रायल देणार आहे.









