69 हजार पेट्रोल पंपांवर ईवी चार्जिंग कियोस्क बसविण्याची सरकारची तयारी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशात इलेक्ट्रिक मोबिलिटीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार 69 हजारांहून अधिक पेट्रोलपंपांवर इलेक्ट्रिक व्हेईकल (ईवी) चार्जिंग कियोस्क बसविण्याचा विचार करत आहे. याचबरोबर सरकारी तेल कंपन्यांची मालकी असलेल्या तसेच संचालित केल्या जाणाऱया पेट्रोलपंपांवर ईवी चार्जिंग कियोस्क सुरू करण्याचीही योजना विचाराधीन आहे.
ईवी चार्जिंग सुविधेसंबंधी अलिकडेच एक आढावा बैठक पार पडली आहे. या बैठकीत ऊर्जामंत्री आर.के. सिंग यांनी पेट्रोल पंपांवर चार्जिंग कियोस्क बसविण्यासाठी पेट्रोलियम मंत्रालय आदेश देऊ शकते, अशी सूचना केली आहे. याचबरोबर पेट्रोलपंप चालकांना किमान एक चार्जिंग कियोस्क सुरू करण्यास सुचविले जाऊ शकते. या पुढाकारामुळे देशातील सर्व पेट्रोलपंपांवर ईवी चार्जिंग सुविधा उपलब्ध करण्याचे लक्ष्य गाठण्यास मदत होणार आहे.
पर्यायी इंधनाची उपलब्धता
काही महिन्यांपूर्वी पेट्रोलियम मंत्रालयाने पेट्रोल पंपांसाठी नवी मार्गदर्शक तत्वे प्रसिद्ध केली होती. यानुसार नव्या पेट्रोल पंपांवर किमान एक पर्यायी इंधन उपलब्ध होणे आवश्यक आहे. दिशानिर्देशानुसार नवे पेट्रोल पंप पर्यायी इंधनाच्या स्वरुपात व्हेईकल चार्जिंग सुविधा उपलब्ध करत आहेत. तर जुन्या पेट्रोल पंपांवर ईवी चार्जिंग कियोस्क बसविण्यात आल्यास मोठा बदल घडून येणार आहे.
ई-मोबिलिटी
देशात सुमारे 69 हजार पेट्रोल पंप आहेत. सर्व पेट्रोल पंपांवर ईवी चार्जिंग सुविधा मिळाल्याने ई-मोबिलिटीला चालना मिळणार आहे. सद्यकाळात चार्जिंग सुविधेच्या अपुऱया प्रमाणामुळे लोक ईलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यास टाळाटाळ करत आहेत.
मोठय़ा शहरांसाठी योजना
ऊर्जा मंत्रालय आता महामार्गासोबतच दिल्ली-एनसीआर, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद, बेंगळूर, वडोदरा आणि भोपाळमध्ये ईवी चार्जिंग सुविधा विकसित करण्याची योजना आखत आहे. या सुविधेमुळे लोकांना ईलेक्ट्रिक मोबिलिटी स्वीकारण्यास प्रोत्साहित करता येणार आहे. कुठल्याही शहरात दोन किंवा 3 चार्जिंग स्थानक निर्माण करणे लाभदायक ठरणार नसल्याचे मंत्रालयाचे मानणे आहे. याचबरोबर केंद्र सरकार दिल्लीतील सार्वजनिक परिवहनला पूर्णपणे ईलेक्ट्रिकद्वारे संचालित करू पाहत आहे. ही व्यवस्था टप्प्याटप्प्याने अन्य शहरांमध्ये लागू करण्यात येणार आहे.









