वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बांगलादेश नेमबाजी फेडरेशनतर्फे रविवारी आयोजिलेल्या शेख रस्सेल आंतरराष्ट्रीय एअर रायफल ऑनलाईन नेमबाजी स्पर्धेत भारताची महिला नेमबाज इलावेनिल वलरिवन हिने सुवर्णपदक तर पुरूषांच्या विभागात भारताच्या शाहू तुषार मानेने रौप्यपदक पटकाविले.
या स्पर्धेमध्ये सहा देशांचे नेमबाज सहभागी झाले होते. महिलांच्या विभागात टॉप सीडेड इलावेनिल 627.7 गुणांसह सुवर्णपदक तर जपानच्या शोरी हिराताने 622.6 गुणांसह रौप्यपदक आणि इंडोनेशियाच्या विद्या तोइबाने 621.1 गुणांसह कास्यपदक मिळविले. इलावेनिलने सुवर्णपदकासह 1000 डॉलर्सची कमाई केली. पुरूषांच्या विभागात जपानच्या ओकादाने 630.9 गुणांसह सुवर्णपदक, भारताच्या शाहू मानेने 623.8 गुणांसह रौप्यपदक आणि बांगलादेशच्या बाकी अब्दुल्लाने 617.3 गुणांसह कास्यपदक मिळविले. या स्पर्धेत कोरिया आणि भूतानचे नेमबाज सहभागी झाले होते.









