वृत्तसंस्था/ सॅन फ्रान्सिस्को
बुद्धिबळ टूरवरील येथे सुरू असलेल्या मेलवॉटर बुद्धीबळ चॅम्पियन्स स्पर्धेत भारताचा ग्रँडमास्टर अर्जुन इरीगेसीने आपला पहिला विजय नोंदवला. त्याचप्रमाणे भारताच्या आर. प्रग्यानंदला चौथ्या फेरीमध्ये हार पत्करावी लागली.
अर्जुन इरीगेसीने चौथ्या फेरीतील लढतीत अजरबेजानच्या मेमीडेरोव्हचा 3-1 अशा गुणांनी पराभव केला. इरीगेसीचा स्पर्धेतील हा पहिला विजय आहे. दुसऱया एका सामन्यात अमेरिकेचा ग्रँडमास्टर वेस्ले सो याने भारताच्या प्रग्यानंदचा 2-1 अशा गुणांनी पराभव केला. टॉप सिडेड मॅग्नस कार्लसन या नॉर्वेच्या ग्रँडमास्टरने हॉलंडच्या ग्रँडमास्टर अनिष गिरीचा 3-0 असा पराभव केला. कार्लसनने हा सामना 71 व्या चालीत जिंकला. स्पर्धेच्या गुणतक्त्यात ग्रँड मास्टर कार्लसनने आपले सर्व डाव जिंकत चौथ्या फेरीअखेर 12 गुणासह आघाडीचे स्थान मिळविले आहे. दुडा 9 गुणासह दुसऱया, लियाम ली सात गुणासह तिसऱया तर सो सहा गुणासह चौथ्या स्थानावर आहे. भारताचा प्रग्यानंद 4 गुणासह सहाव्या स्थानावर आहे. आणि इरीगेसीने चौथ्या फेरीअखेर 3 गुणासह सातवे स्थान मिळविले आहे. या स्पर्धेसाठी एकूण 210,000 अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. सदर स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीने खेळविली जात असून रॉऊंड रॉबिन गटातील प्रत्येक विजयाला 7500 डॉलर्सचे बक्षीस देण्यात येणार आहे. भारताच्या आर. प्रग्यानंदला चौथ्या फेरीतील डावात अमेरिकेच्या ग्रँडमास्टर वेस्ले सो कडून पराभव पत्करावा लागला.









