सौदी-युएई अन् बहारीनसोबत संरक्षण आघाडी
वृत्तसंस्था / तेल अवीव
इराणच्या अणुबॉम्ब कार्यक्रमामुळे इस्रायलसह बहुतांश आखाती देश चिंतेत पडले आहेत. इराणला अण्वस्त्रापर्यंत पोहोचण्यापासून रोखण्यासाठी इस्रायल सज्ज असल्याचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी म्हटले होते. याच पार्श्वभूमीवर इस्रायलच्या पुढाकारावर इराणविरोधी सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात आणि बहारीन हे देश एकत्रितपणे संरक्षण आघाडी तयार करणा आहेत.
युएई आणि बहारीनसोबत इस्रायलच्या अब्राहम करारानंतर मध्यपूर्वेतील देशांमधील सामरिक स्थिती अचानक बदलली आहे. सौदी अरेबियाने इस्रायलला अद्याप अधिकृत मान्यता दिलेली नाही, तरीही सौदी अरेबिया इस्रायलच्या गुप्तचर संस्थांसोबत मिळून इराणच्या विरोधात संरक्षणात्मक तयारी करत आहे.
इराण वेगाने अण्वस्त्रांमध्ये वापरण्यात येणाऱया युरेनियमचे संपृक्तीकरण करत आहे. इराणने नैटांजच्या युरेनियम संपृक्तीकरण केंद्रात आयआर-2एम सेंट्रीफ्यूजचे आणखीन तीन क्लस्टर निर्माण केले आहेत. हवाई हल्ल्याची भीती पाहता या क्लस्टरला भूमिगत स्वरुप देण्यात आल्याची माहिती आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने स्वतःच्या एका गोपनीय अहवालात मांडली आहे. काही महिन्यांपूर्वी इराणच्या आण्विक प्रकल्पावर इस्रायलच्या विमानांनी हल्ला केला होता.
अत्याधुनिक सेंट्रीफ्यूजही तयार आण्विक करारानुसार इराण केवळ पहिल्या पिढीच्या आयआर-1 सेंट्रीफ्यूजचा वापर करू शकतो. तर इराणमध्ये आता आयआर-2एम सेंट्रीफ्यूज निर्माण करण्यात आला आहे. याच्या मदतीने इराण अणुबॉम्ब तयार करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात युरेनियम प्राप्त करू शकतो.









