इस्रायलने उचलले पाऊल : एफ-35 विमानांकडून क्षेपणास्त्र हल्ला
वृत्तसंस्था/ तेहरान
इस्रायल आणि त्याचा कट्टर शत्रू इराणदरम्यान सायबर हल्ल्याने टोक गाठले आहे. नव्या घटनेत इस्रायलने जोरदार सायबर हल्ला करून इराणच्या आण्विक तळांमध्ये दोन स्फोट घडवून आणले आहेत. यातील एक तळ युरेनियम संपृक्तीकरण केंद्र असून दुसरे क्षेपणास्त्र निर्मिती केंद्र आहे. याचबरोबर इस्रायलने स्वतःच्या घातक एफ-35 लढाऊ विमानांच्या मदतीने इराणच्या पर्चिन भागात क्षेपणास्त्र निर्मिती केंद्रांवर हल्ला चढवून ते उद्ध्वस्त केले आहे.
अल जरीदा या कुवैतच्या वृत्तपत्रानुसार ही घटना मागील आठवडय़ात घडली आहे. इस्रायलच्या सायबर हल्ल्यामुळे इराणच्या नतांज आण्विक संपृक्तीकरण केंद्रात गुरुवारी आग लागली आणि मोठा स्फोट झाला. हे केंद्र पूर्णपणे भूमिगत होते. इस्रायलच्या या हल्ल्यामुळे इराणचा आण्विक कार्यक्रम आता दोन महिन्यांनी मागे पडला आहे.
इराणकडूनही हल्ल्याचा प्रयत्न
एप्रिल महिन्यात इराणने इस्रायलच्या पाणीपुरवठा यंत्रणेला हॅक करण्याचा प्रयत्न केला होता. इराणच्या या हल्ल्याला इस्रायलच्या सायबर डिफेन्सने हाणून पाडले होते. इराणला यश आले असते तर पाण्यातील क्लोरिनचे प्रमाण धोकादायक पातळीपर्यंत वाढले असते. अशा स्थितीत पूर्ण इस्रायलमध्ये पाण्याचे प्रचंड संकट निर्माण होण्याची भीती होती.
इस्रायलकडून बॉम्बवर्षाव
इस्रायलच्या एफ-35 स्टील्थ लढाऊ विमानांनी पर्चिन भागातील एका इराणी तळावर बॉम्ब फेकले आहेत. या ठिकाणी इराणकडून क्षेपणास्त्रांची निर्मिती केली जायचे असे मानले जाते. इराण स्वतःच्या शस्त्र आणि क्षेपणास्त्रांना आधुनिक स्वरुप देत ती ज्यूविरोधी हिजबुल्ला या पॅलेस्टिनी संघटनेला पुरवत असल्याचा इस्रायलचा आरोप आहे. या दोन्ही हल्ल्यांची इस्रायलने अद्याप पुष्टी केलेली नाही.









