वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
बहुचर्चित तोशाखाना प्रकरणी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पाकिस्तानचे पोलीस रविवारी त्यांच्या घरी पोहोचले. मात्र, ते घरी नसल्याचे निदर्शनास आले. यानंतर पोलीस घरी नोटीस देऊन परतले. सदर नोटिसीमध्ये त्यांना 7 मार्च रोजी न्यायालयात हजर होण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. 28 फेब्रुवारी रोजी इस्लामाबाद सत्र न्यायालयाने इम्रानला सरकारी तिजोरीतून (तोशाखाना) कोटय़वधी रुपयांच्या भेटवस्तू स्वस्तात विकल्याचा आरोप ठेवला होता. यानंतर त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंटही जारी करण्यात आले होते. इम्रानवर तीनवेळा न्यायालयात सुनावणीदरम्यान हजर न राहिल्याचा आरोप आहे.
इम्रान खान यांना अटक केल्यास देशात वातावरण भडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीतही न्यायालयाने जारी केलेले वॉरंट घेऊन पोलिसांचे पथक त्यांच्या मागावर असल्याचे समजते. त्यांच्या अटकेची शक्यता व्यक्त केली जात असतानाच पोलिसांचे स्पष्टीकरणही पुढे आले आहे. त्यांना अटक करणे हा मुळीच उद्देश नव्हता. हे करायचे असेल तर कोणतीही शक्ती रोखू शकणार नाही. आम्ही इम्रानला अजिबात भेटलो नाही, असे पोलिसांनी म्हटले आहे. याचदरम्यान, रविवारी सायंकाळच्या सुमारास त्यांनी लाहोर येथे कार्यकर्त्यांना संबोधित केल्याचे समजते. मात्र, रात्रीपर्यंत त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली नव्हती. दुसरीकडे, इम्रान खान यांनी ट्विट करून पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि माजी लष्करप्रमुख जनरल बाजवा यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
इम्रान खान हे आपली अटक टाळण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. याचदरम्यान इम्रान खान यांना अटक झाल्यास पाकिस्तानमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा भडका उडणार असल्याचा दावा पक्षाच्या प्रवक्त्यांकडून करण्यात आला. मात्र, इस्लामाबाद पोलिसांनी पीटीआय कार्यकर्त्यांना इम्रान खानच्या अटकेत अडथळा आणू नये, असा इशारा दिला आहे. न्यायालयाच्या आदेशात अडथळा आणणाऱयांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे ट्विट पोलिसांनी केले आहे.









