सरत्या वर्षाने मराठी भाषेला दोन आंग्ल शब्दप्रयोग दिले. ‘इम्युनिटी’ आणि ‘फ्रॉम होम’. यांचे भाषांतर करणे शक्य आहे. पण हे शब्दप्रयोग जसे जिभेवर रुळले तसे ‘रोगप्रतिकारशक्ती’ आणि ‘घरातून’ हे शब्द रुळले नाहीत, रुळतील असे वाटत नाही.
गेल्या वषी ‘इम्युनिटी’ नामे शक्तिदेवतेची लोकांनी मनोभावे उपासना केली. तिला प्रसन्न करण्यासाठी सॅनिटायझर नामे पवित्र जल स्वतःच्या अंगावर शिंपडून देह शुचिर्भूत केला. तिचे तीर्थ म्हणून विविध काढे प्राशन केले, तिचा प्रसाद म्हणून विविध जीवनसत्त्वांच्या गोळय़ा गिळल्या, ऍक्मयुपंक्चर आणि रेकी वगळता बहुतेक सर्व प्याथीतल्या गोळय़ा-चूर्णे-औषधे घशाखाली घातली. दुचाकीवर बसून सुसाट जाणारी हडकुळी मुले अनेकांनी पाहिली असतील. त्या दुचाकींच्या मागच्या चाकाच्या राडारोधक ऊर्फ मडगार्डवर विविध घोषणा लिहिलेल्या असतात– उदाहरणार्थ अमुकसाठी काय पण कधी पण… तसा सारा देश, सारे जग इम्युनिटीसाठी काय पण कधी पण तोंडात टाकायला तयार झाले होते. पण सुरक्षा व्यवस्था भेदून अतिरेकी देशात दहशतवादी कारवाया करतात, त्याप्रमाणे अनेकांच्या देहांवर कोरोनाने हल्ला चढवलाच. आपल्याला हा जागतिक कीर्तीचा आजार झाला, त्यातून आपण बरे झालो याचेही कौतुक अनेकांनी समाजमाध्यमांवर व्यक्त केले.
या काळात अनेक कंपन्यांनी, कचेऱयांनी आपल्या कर्मचाऱयांना घरातूनच संगणक-आंतरजालाच्या सहाय्याने काम करण्याच्या सूचना दिल्या. वर्क फ्रॉम होम हा शब्दप्रयोग रूढ झाला होता. लोकल किंवा बस पकडणे, लेट मार्क, हाफ डे आणि मुख्य म्हणजे कचेरीसाठी म्हणून व्यवस्थित पोषाख करणे वगैरेतून सुटका झाली म्हणून आधी आनंद झाला. पण नंतर कंटाळा आला. काम करताना चहा प्यायला किंवा सिगारेटी फुंकायला जाण्याची मौज हरपली. इथे उठून फार तर घराच्या बाल्कनीत किंवा स्वयंपाकघरात जाता येत होतं. साहेबांचा डोळा चुकवून लवकर पळण्यातली मजा संगणक चालू ठेवून काम थांबवण्यात नाही.
घराबाहेर पडण्याच्या सर्वच वाटा बंद झाल्या. वर्क फ्रॉम होम, मिटींग फ्रॉम होम, शाळा फ्रॉम होम, ड्रिंक फ्रॉम होम, प्रणयाराधन फ्रॉम होम. बाबूलोक चिरीमिरी फ्रॉम होम कशी घेत असतील बरे?
यंदा 31 डिसेंबर देखील सेलिब्रेट फ्रॉम होम झाला. पोलीस मात्र मद्यपींना पकडणे वगैरे रोमहर्षक अनुभवांना यंदा मुकले.








