प्रतिनिधी /बेळगाव
इमारत बांधकाम परवानगीच्या ऑनलाईन प्रणालीमध्ये अनेक अडचणी निर्माण झाल्याने बांधकाम परवाना प्रक्रिया ठप्प झाली होती. त्यामुळे गेल्या पंधरादिवसांपासून शहरवासियांना बांधकाम परवान्यासाठी धावपळ करावी लागत होती. मात्र मंगळवारपासून बांधकाम परवान्याची प्रक्रिया सुरळीत झाली आहे.
अनधिकृत बांधकाम रोखण्यासाठी तात्काळ इमारत बांधकाम परवाना देण्याकरिता ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. ई निर्माण या ऑनलाईन प्रक्रियेद्वारे इमारत बांधकाम परवाना देण्यात येत आहे. मात्र सदर ऑनलाईन प्रक्रियेत अनेक त्रुटी निर्माण झाल्याने बांधकाम परवाना वेळेत मिळत नव्हता. याबाबत असंख्य तक्रारी वाढल्या होत्या. नगरविकास खात्याने ऑनलाईन प्रक्रियेतील त्रुटींचे निवारण करून बांधकाम परवानगी देण्याची सुविधा उपलब्ध केली होती. मात्र सातत्याने अडचणी निर्माण होत आहेत. आठ दिवसांपूर्वी ऑनलाईन प्रक्रियेत पुन्हा तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने इमारत बांधकाम परवानगी प्रक्रिया ठप्प झाली होती.
मागील दीड वर्षात कोरोनामुळे बांधकामे मंदावली होती. पण दिवाळीच्या मुहूर्तावर घरे बांधण्यासाठी अनेक नागरिकांनी इमारत बांधकाम परवान्यासाठी धावपळ चालविली होती. पण ऑनलाईन प्रक्रियेत तांत्रिक बिघाड झाल्याने बांधकाम परवानगीकरिता अर्ज करता आला नाही. गेल्या पंधरादिवसांपासून बांधकाम परवानगीची प्रक्रिया ठप्प झाल्याने नागरिकांना धावपळ करावी लागली. मात्र इमारत बांधकाम ऑनलाईन प्रक्रियेतील अडचणीची दुरुस्ती करून बांधकाम परवाना देण्याची प्रक्रिया सुरळीत करण्यात आली आहे. मंगळवारी सकाळपासून बांधकाम परवानगीचे अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ करण्यात आले असल्याची माहिती महापालिकेतून उपलब्ध झाली आहे.









