प्रतिनिधी /बेळगाव
मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये 75 वा इन्फंट्री डे बुधवारी साजरा करण्यात आला. काश्मीर येथे भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्याला चोख प्रत्युत्तर देऊन धाडसाचे एक नवे रुप देशाला दाखवून दिले. याची आठवण म्हणून 27 ऑक्टोबरला इन्फंट्री डे साजरा केला जातो.
मराठा लाईट इन्फंट्रीच्या शर्कत वॉर मेमोरियल येथे बुधवारी हा कार्यक्रम पार पडला. यावेळी पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये कोरोना काळात सर्वोत्तम सेवा दिलेल्या महिला कोविड वॉरियरचा सन्मान करण्यात आला.
राष्ट्र प्रथम या भावनेतून त्यांनी दिलेल्या सेवेमुळे अनेकांचे जीव वाचले आहेत. यामध्ये डॉक्टर, स्वच्छता कर्मचारी, महिला पोलीस कर्मचारी तसेच सामाजिक कार्यकर्ते यांचा समावेश आहे. मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्या अधिकाऱयांकडून या सर्वांचा प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी मराठा लाईट इन्फंट्रीचे अधिकारी व जवान उपस्थित होते.









