रातोरात सपाटीकरण…चिऱयांचे ढीग…शेड आणि सर्व्हीस रॅम्प : रत्नागिरी मिऱया-नागपूर महामार्ग दुपदरीकरणाची गंमत : लगतची बांधकामे हटणार पण..
प्रतिनिधी / रत्नागिरी
रत्नागिरी मिऱया-नागपूर महामार्गाच्या दुपदरीकरणासाठी जागा संपादित होऊन त्याच्या निवाडय़ानुसार जमीनमालकांना मोबदला वाटपही प्रशासन स्तरावरून सुरू झालेय. लवकरच रुंदीकरणाच्या कामाला प्रारंभ होणार म्हणून या महामार्गालगतचे व्यावसायिक हटवले जाणार आहेत. पण रत्नागिरी शहरानजीक साळवी स्टॉपपासून पुढे टीआरपी, एमआयडीसी पॉवरहाऊस दरम्यान या मार्गाला खेटून असलेल्या मोकळय़ा जागेत दिवस-रात्र उभी राहत असलेल्या अनधिकृत बांधकामांच्या बाजारपेठेला नेमका वरदहस्त कोणाचा, तर संबंधित यंत्रणाही त्या बाबत मुग गिळून गप्प असल्याने चर्चेला ऊत आला आहे.
मिऱया-नागपूर या महामार्गाचे लवकरच दुपदरीकण होणार आहे. रत्नागिरी व संगमेश्वर तालुक्यातील 27 गावांतील जमिनी त्यासाठी संपादित करण्यात आल्या आहेत. या मार्गाच्या भूसंपादनासाठी संगमेश्वर तालुक्यातील 13 गावांमधील एकूण 13,36,837 चौरस मीटर तर रत्नागिरी तालुक्यातील 14 गावांतील 6,52,220 चौरस मीटर क्षेत्र संपादित केले आहे. या दोन्ही तालुक्यातील 16 गावांतील जमीन मालकांना एकूण 314 कोटी 13 लाख 21 हजार इतकी मोबदला निवाडा रक्कम आहे. रत्नागिरी तालुक्यासाठी आलेल्या 69 कोटी 13 लाख 19,164 रु. तर संगमेश्वरसाठी आलेल्या 6 कोटी 63 लाखांच्या मोबदला रक्कमेचे वाटप प्रशासनस्तरावरून सुरू झाले आहे. आतापर्यंत केवळ 8 गावांच्या मोबदल्याची कार्यवाही सुरू झाली आहे. उर्वरित गावांना मोबदला रक्कमेसाठी प्रतीक्षा आहे.
महामार्गाचे दुपदरीकणाचे काम सुरू झाल्यानंतर लगतच्या बाधित क्षेत्रात असलेली सर्व बांधकामे हटणार आहेत. त्यामुळे बाधित होणाऱया अनेक व्यावसायिकांनी ही बांधकामे हटवण्यापूर्वीच पर्यायी व्यवस्थेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत.पण शहरानजीकच्या साळवी स्टॉपपासून ते जे.के.फाईल्सपासून त्याही पुढे टीआरपी अगदी एमआयडीसी-पॉवरहाऊस कुवारबावच्या उतारापर्यंत भलतीच बांधकामे या मार्गाला खेटून उभी राहू लागली आहेत. मिऱया-नागपूर महामार्ग व एमआयडीसी रोड यामधील चिंचोळय़ा मोकळी जागा कुणाच्या मालकीची, असा प्रश्न यामार्गावरून येणाऱया-जाणाऱया सर्वांनाच पडला आहे.
मार्गालगतच्या मोकळी जागेत यापूर्वीपासून काही बांधकामे उभी राहून त्या ठिकाणी छोटे-छोटे व्यवसाय उभे राहिले. तरीही ही जागा मोठय़ा प्रमाणात मोकळी राहिली होती. त्या जागेवर झाडेझुडपे वाढलेली होती. रस्ता रुंदीकरण होणार असल्याने त्याकडे कुणी फारसे धजावत नव्हते. पण गेल्या महिनाभरापासून ही जागा महामार्ग प्राधिकरणाने संपादित केली की व्यावसायिकांना करारावर दिली, असा सवाल उपस्थित होत आहे. रातोरात जेसीबी लावून त्या जागेचे सपाटीकरण होत असल्याने जणू महामार्गाचे काम सुरू झाल्याचा भास अनेकांना होतो. पण रात्र संपून सकाळ होताच त्या ठिकाणी चिऱयांचे मारलेले ढीगारे व उभी राहणारी बांधकामे, अनेक शेडच काय तर सर्व्हीस रॅम्पही बांधलेला पाहून नवी बाजारपेठ उदयास येत असल्याचे चित्र दिसत आहे.
ओले गुपित दडल्याची खमंग चर्चा
एकीकडे हा महामार्ग रुंदीकरण होत आहे. पण त्यालगत नव्याने होणाऱया या बांधकामांना संबंधित प्रशासकीय यंत्रणेकडून मिळणारे खतपाणी मिळण्यामागे काहीतरी ओले गुपित तर दडले नाही ना?, की स्थानिक स्तरावरून कुणाचा वरदहस्त लाभलाय, याचीच जोरदार चर्चा आता रत्नागिरीभर सुरू आहे. व्यावसायिकांची बांधकामे दुपदरीकणात पाडली जाणार मग या नव्या खर्चाचा अट्टहास कशासाठी, असेही प्रश्न नागरिकांना पडले आहेत.









