मिरज-पंढरपूर रोडवरील स्मशानभूमित नातेवाईकांची होतेय लुट : दहनासाठी मागतात 10 हजार : प्रशासन दखल घेणार का?
सुभाष वाघमोडे/ सांगली
कोरोना महामारीत किड्या -मुंगीसारखा माणसांचा जीव जात आहे. लाखो रूपयांचे दवाखान्याचे बिल भागवूनही माणूस हाताला लागेनासा झाला आहे. अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली असाताना या महामारीत मृत्युमुखी पडलेल्या नातेवाईकांची रूग्णालयांपासून स्मशानभूमीपर्यंत सर्वत्र लुटच होताना दिसत आहे. मृतदेह दहन करण्यासाठी तब्बल दहा हजार रूपयांची मागणी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मानवतेचा बुरखा पांघरून मडÎाच्या टाळूवरचे लोणी खाणाऱयांकडे मनपा आणि जिल्हा प्रशासन लक्ष देणार का? हा खरा प्रश्न आहे.
कोरोनाच्या दुसऱया लाटेने पुन्हा सर्वत्र हाहाकार उडवून दिला आहे. रूग्णसंख्या झपाटयाने वाढत असून मृत्यूचा आकडाही वाढतच आहे. या महाभयंकर रोगाची लागण सोलापूर जिल्हÎातील मंगळवेढा तालुक्यातील एका गावातील कुटुंबातील सदस्यांना झाली. एक-दोन नव्हे तर तब्बल पाच जणांना कोरोनाची बाधा झाली. यातील दोघांवर पंढरपूर तर तिघांवर जिल्हÎातील जत आणि कुपवाड येथे उपचार सुरू होते. पंढरपूर येथे उपचार घेणाऱया दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर जत ग्रामीण रूग्णालयातील दोघे उपचारानंतर बरे झाले. मात्र कुपवाड येथील एका खासगी कोव्हिड सेंटरमध्ये उपचार घेणाऱया 52 वर्षीय महिलेला कोरोना होऊन गेल्याने तिचा अहवाल निगेटिव्ह आला होता. धाप आणि खोकल्याचा त्रास होता. तब्बल 21 दिवसाच्या उपचारानंतर बुधवारी तिचे निधन झाले. गावाकडे दोघांचे कोरोनाने निधन झाले होते, यामुळे भितीचे वातावरण होते. त्यामुळे या मृत महिलेवर गावात नेवून अत्यंसंस्कार करण्यापेक्षा येथेच हा कार्यक्रम करण्याचा निर्णय नातेवाईकांनी घेतला. मात्र जिल्हÎाबाहेरील पेशंट असल्याने मनपाने पास देण्यास नकार दिला. त्यामुळे नातेवाईकांसमोर मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला. दोन-तीन तासानंतर मनपातील एका वरिष्ठ अधिकाऱयांची ओळख काढून त्यांना विनंती केली. मानवतेच्या दृष्टिकोनातून संबधित अधिकाऱयांने पंढरपूर-मिरज रोडवर असलेल्या स्मशानभूमीत महिलेचा मृतदेह नेण्यास सांगितले. नंतर शववाहिकेचा प्रश्न निर्माण झाला. सर्वत्र संपर्क साधला, मनपाच्या कुपवाड येथील शववाहिकेच्या चालकाकडेही चौकशी केली, मात्र शववाहिका मिळाली नाही, शेवटी हतलब झालेल्या नातेवाईकांनी त्या हॉस्पिटलच्या डॉक्टरांकडे विनंती केली. त्यांनीही नातेवाईकांची परिस्थिती पाहून शववाहिका दिली.
दुपारी तीनच्या सुमारास मृतदेह मिरज-पंढरपूर रोड येथील स्मशानभूमीत नेला. तेथे त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आला. मात्र यावेळी संबंधित कर्मचाऱयाने अंत्यसंस्काराचे दहा हजार देण्याची मागणी केली. एका बाजुला कुटुंबावर तिघांच्या निधनाने दुःखाचा डोंगर कोसळला असताना तसेच लाखो रूपयांची दवाखान्याची बिलं भागवून नातेवाईक अधीच मेटाकुटीला आले असताना अशा परिस्थितीही स्मशानातील कर्मचाऱयांनी मडÎाच्या टाळूवरचे लोणी खाल्ले, हा गंभीर प्रकार आहे. वास्तविक कोरोनाने मयत झालेल्या रूग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी मनपा हजारो रूपये खर्च करीत असताना पुन्हा या कर्मचाऱयांकडून लुट कशासाठी असा पीडित नातेवाईकांकडून केला जात आहे. या गंभीर प्रकाराची मनपा प्रशासन आणि जिल्हा प्रशासन दखल घेऊन संबंधित कर्मचाऱयांवर कारवाई करणार का? हा खरा प्रश्न आहे.
दादा तुम्ही हायं म्हणून तीन हजार
संबंधित महिलेवर मिरज-पंढरपूर रोडवरील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी तेथील कर्मचाऱयांकडून दहा हजाराची मागणी करण्यात आली. परंतु नातेवाईकांपैकी एकजण पोलीस कर्मचारी निघाला. त्याने ओळख सांगितली. त्यामुळे दादा तुम्ही हाय म्हणून तीन हजार द्या अन्यथा आम्ही दहा हजारच घेतो, असा पावशेर त्या नातेवाईक पोलीस कर्मचाऱयांवर ठेवला. अखेर नातेवाईकाने तीन हजार दिले त्यानंतर अत्यंसंस्कार झाले.