ऑनलाईन टीम / पुणे :
पुस्तकातल्या प्रत्येक पानापानातल्या एकेका ओळीत दडलेल्या छत्रपती शिवरायांच्या शूर मावळ्यांचा इतिहास उत्सव आणि स्मारकांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचवण्याचे काम करत राहणे हे आपले कर्तव्य आहे. त्यासाठी ‘चपराक प्रकाशन’ने घेतलेला पुढाकार महत्त्वपूर्ण आहे असे प्रतिपादन पुण्यातील शिवजयंती रथमहोत्सव सोहळ्याचे अध्यक्ष, प्रवर्तक, संकल्पक, संयोजक अमित गायकवाड यांनी केले.
‘शिवरायांचे एकनिष्ठ शिलेदार वीर येसाजी कामठे’ या रवींद्र कामठे लिखित पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात झाले त्याप्रसंगी गायकवाड बोलत होते.
यावेळी पिंपरी चिंचवड महापालिकेचे नगरसेवक तुषार कामठे, ‘चपराक’चे प्रकाशक घनश्याम पाटील, शूरयोद्धा येसाजी कामठे प्रतिष्ठान परिवाराचे सदस्य गोरख कामठे, डॉ. कुणाल कामठे, सामाजिक कार्यकर्ते गणेश कामठे आदी मान्यवर उपस्थित होते.
‘चपराक’ने या पुस्तकाच्या माध्यमातून वीर येसाजी कामठे यांचा पराक्रम शब्दबद्ध करून जो इतिहास जागविला आहे तो आजच्या पिढीला निश्चितच प्रेरणादायी ठरेल असे गायकवाड यांनी सांगितले.
लेखक रवींद्र कामठे यांनी हे पुस्तक लिहिण्यामागची भूमिका विशद केली. या अशा प्रेरणादायी चरित्रांची एक मालिकाच ‘चपराक’कडून प्रकाशित केली जात असून इतिहासात दडून राहिलेल्या विविध महापुरुषांचा पराक्रम आम्ही लवकरच वाचकांसमोर आणणार आहोत असा मानस घनश्याम पाटील यांनी व्यक्त केला.
प्रेरणादायी चरित्रांवर आधारित पुस्तक प्रकाशित करण्याचा ‘चपराक’चा उपक्रम स्तुत्य असून ही पुस्तके अभ्यासक्रमात समाविष्ट व्हायला हवीत. त्यासाठी आम्ही आणि आमचा कामठे परिवार प्रयत्नशील राहील असा विचार डॉ. कुणाल कामठे यांनी मांडला.
आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना गोरख कामठे यांनी ‘हे पुस्तक म्हणजे समस्त कामठे परिवाराच्या पूर्वजांनी स्वराज्यासाठी केलेल्या कार्याचा गौरव असून वीर येसाजी कामठे आणि शहीद अशोक कामठे यांच्या स्मृतीस अर्पण करतो,’ असे उद्गार काढले.
यावेळी चपराक परिवाराचे सदस्य आणि शूरयोद्धा येसाजी कामठे प्रतिष्ठान परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. लेखक-व्याख्याते संदीप चव्हाण यांनी सूत्रसंचालन केलेे.
‘वाचनसंस्कृती कमी होतेय’ असे म्हटले जात असतानाच ‘चपराक’ने मात्र पुस्तक विक्रीचे अनेक यशस्वी प्रयोग केले आहेत. ‘वीर येसाजी कामठे’ या पुस्तकाच्या ‘शूरयोद्धा येसाजी कामठे प्रतिष्ठान’ने दोन हजार प्रती विकत घेतल्या. याच कार्यक्रमात नगरसेवक तुषार कामठे यांनी पाचशे प्रती विकत घेतल्या तर उपस्थितांनी कार्यक्रमस्थळी 250 प्रती विकत घेतल्या. तीन हजार पैकी 2750 प्रती प्रकाशनाच्याच दिवशी विकल्या गेल्याने ‘चपराक’ची प्रेरक चरित्रमालेची सुरूवात दणक्यात झाली आहे.









