उपमुख्यमंत्र्यांच्या निवेदनाने खळबळ
प्रतिनिधी /पणजी
‘इतर आमदारांप्रमाणे आपण नोकरीसाठी पैसे घेत नाही’, हे वाक्य खुद्द उपमुख्यमंत्र्यांच्या तोंडून निघाल्याने आणि त्या संबंधिचा एक व्हिडियो व्हायरल झाल्याने गोव्यात सर्वत्र एकच खळबळ उडाली. उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी आपण कोणाचेही नावे घेतले नाही वा कोणी पैसे घेतले असे म्हटलेले नाही, असे खुलासेवजा निवेदन केले खरे परंतु, या एका निवेदनाने नेत्यानेच सर्व आमदारांना उघडे पाडले अशी खमंग चर्चा सुरु झाली आहे.
या संदर्भातील मिळालेल्या माहितीनुसार, केपे मतदारसंघात बाबू कवळेकर एका समारंभाला गेले होते. समारंभाला चांगला प्रतिसाद मिळाला. बरेच लोक यावेळी उपस्थित होते. बाबूनीदेखील विकासासंदर्भात चांगली निवेदने केली. त्यानंतर व्यासपीठावरुन उतरुन बाबू कवळेकर हे आपल्या गाडीत परतत असताना काही युवकांनी बाबूना गाठले आणि आम्हाला किंवा आमच्या वाडय़ावरच्या मुलांना नोकऱया कधी देणार? असा सवाल केला. बाबूंनी उत्तरादाखल आपण काँग्रेसमधून भाजपमध्ये का आलो? त्याचे कारण विषद करीत बाबू कवळेकर म्हणाले की, आम्हाला आमच्या मतदारसंघातील युवकांना रोजगार द्यावयाचा आहे. रोजगार हा मुख्य उद्देश होता.
ही निवेदने कितींदा ऐकायची? आमच्या वाडय़ावर दोन ते तीन जणांना तरी रोजगार द्या, असे एक युवक म्हणाला. दुसऱया युवकाने तर नोकऱया कधी देणार ते सांगा, अशा मागण्या सुरु केल्या. तीन ते चार युवकांनी परत परत हा विषय मांडला. त्यांच्या शंकांचे समाधान करताना बाबू कवळेकर यांनी थोडे दिवस थांबा, कामे होतील. आताच जाहीर झालेली आहेत पदे. काळजी करु नका आणि आपण ही कामे करणारच. आपण इतर आमदारांप्रमाणे काही हे घेऊन (इथे त्यांनी पैसे घेतल्याच्या हाताने कृती दाखवित) काही काम करणाऱयांपैकी आपण नाही, असे नमूद केले. आपण तुमचे काम निश्चित करणार असे सांगितले खरे! परंतु त्यामुळे इतर आमदार पैसे घेऊन रोजगार देतात, असा त्याचा अर्थ झाला. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी बाबू कवळेकर यांच्यावर या प्रकरणी जोरदार टीका केली.
पैसे घेतले असे म्हटलेलेच नाही : कवळेकर
उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांच्याशी संपर्क साधला असता आपण कोणा आमदाराचे नाव घेतले नाही वा कोणावर आरोप केलेला नाही. एवढेच नव्हे तर पैसे घेतले असे शब्द त्या व्हिडियोमध्ये नाही असे ते म्हणाले. त्याचबरोबर आपल्या विरुद्ध विरोधकांना काहीही सापडत नाही त्यामुळे जिथे काही नाही तिथे काही तरी शोधून अकारण बदनाम करण्याचा राजकीय विरोधकांचा प्रयत्न आहे, असे ते म्हणाले. आपण सोमवारी मुख्यमंत्र्यांना भेटलो होतो परंतु या विषयावर मुळीच चर्चा झाली नाही, असे ते म्हणाले. आपल्याला अकारण बदनाम करण्यासाठी विरोधकांची ही योजना आहे, असे बाबू कवळेकर म्हणाले.









