इटलीत 7985 रुग्ण सापडले : इस्रायलमध्ये विदेशी पर्यटकांवर देखरेख सुरू
वृत्तसंस्था/ रोम, जेरूसलेम
इटली या देशात 24 तासांमध्ये कोरोना विषाणूने ग्रस्त असलेल्या 97 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या 463 वर पोहोचली आहे. चीननंतर इटलीत कोरोनाने सर्वाधिक लोकांचा बळी घेतला आहे. इटलीमध्ये आतापर्यंत 7985 रुग्ण आढळून आले आहेत. तर इस्रायलमध्ये दाखल होणाऱया सर्व प्रवाशांना दोन आठवडय़ांसाठी क्वारेंटाईन (वेगळे ठेवले जणार) केले आहे. पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी यासंबंधी घोषणा केली आहे. इस्रायलमध्ये आतापर्यंत 50 रुग्ण आढळून आले आहेत.
हा अवघड निर्णय असला तरीही जनतेच्या हितासाठी आवश्यक असल्याचे उद्गार नेतान्याहू यांनी काढले आहेत. इस्रायलने फ्रान्स, जर्मनी, स्पेन, ऑस्ट्रिया आणि स्वीत्झर्लंडमधून येणाऱया प्रवाशांवर बंदी घातली आहे.
शेख हसिनांचा दौरा रद्द
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी कोरोना विषाणूचा धोका पाहता जपानचा दोन दिवसांचा दौरा रद्द केला आहे. विदेशमंत्री ए.के. अब्दुल मोमिन यांनी मंगळवारी याची माहिती दिली आहे. पंतप्रधान हसिना 30 मार्च रोजी जपानच्या दौऱयावर जाणार होत्या. जपानमध्ये कोरोनामुळे 16 जणांचा मृत्यू झाला असून 1226 रुग्ण आढळून आले आहेत. तत्पूर्वी बांगलादेशात आयोजित होणारा शेख मुजीबर्रहमान यांच्या जयंतीचा शताब्दी सोहळा स्थगित करण्यात आला आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही स्वतःचा बांगलादेश दौरा रद्द केला आहे. बांगलादेशात कोरोनाचे 3 रुग्ण आढळून आले आहेत.
इराणमध्ये स्थिती गंभीर
कोरोना विषाणूमुळे इराणमध्ये एका दिवसात 54 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांनी स्वतःचे वार्षिक भाषण रद्द केले आहे. तेथे आतापर्यंत 7161 रुग्ण आढळून आले असून 291 जणांचा मृत्यू झाला आहे.
इजिप्तमध्ये 17 भारतीय अडकले
इजिप्तमध्ये ‘ए सारा’ या जहाजावर तामिळनाडूचे 17 रहिवासी अडकून पडले आहेत. हे जहाज लक्जर शहरानजीक नील नदीच्या काठावर उभे आहे. या जहाजावरील एक भारतीयासह 45 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तामिळनाडूतील पट्टाली मक्कल काची या राजकीय पक्षाने या सर्व नागरिकांना मायदेशी परत आणण्याचे आवाहन केंद्र सरकारला केले आहे.
इटलीत लॉकडाउन
इटलीने कोरोना विषाणूचे संकट पाहता सोमवारी पूर्ण देशात लॉकडाउन केले आहे. तसेच गर्दी जमविणे आणि लोकांच्या प्रवासावर बंदी घातली आहे. तेथील एकूण बळींचा आकडा 463 वर पोहोचला आहे.
अमेरिकेत 717 रुग्ण
अमेरिकेतील 36 प्रांतांमध्ये कोरोनाचे रुग्ण समोर आले आहेत. अमेरिकेतील एकूण रुग्णांची संख्या 717 वर पोहोचली असून आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाला आहे. यातही सर्वाधिक 22 जणांचा मृत्यू वॉशिंग्टनमध्ये झाला आहे. तर फ्लोरिडा आणि कॅलिफोर्नियात प्रत्येकी 2 जणांना जीव गमवावा लागला आहे.
वुहानमध्ये कोरोनावर नियंत्रण
चीनमध्ये मागील 24 तासांमध्ये कोरोनामुळे 17 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण बळींची संख्या 3136 वर पोहोचली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावाचे प्रमुख केंद्र असलेल्या वुहानमध्ये या जीवघेण्या विषाणूवर नियंत्रण मिळविण्यात आल्याची घोषणा चीनने केली आहे. वुहान या शहराचा चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी दौरा केला आहे. हुबेई आणि वुहान येथील स्थिती सुरळीत करण्याच्या दृष्टीने यश मिळू लागल्याचे उद्गार जिनपिंग यांनी काढले आहेत.
पाकिस्तानात भीतीचे वातावरण
पाकिस्तानात कोरोनाच्या वाढत्या रुग्णामुळे खळबळ उडाली आहे. कराची शहरात एकाच दिवसात 9 रुग्ण आढळून आले आहेत. तर देशातील एकूण रुग्णांची संख्या 18 वर पोहोचली आहे.