वृत्तसंस्था/ इमोला, इटली
रेड बुलच्या मॅक्स व्हर्स्टापेनने अंतिम टप्प्यात संयमी ड्रायव्हिंग करीत येथे झालेल्या एमिलिया रोमांगा ग्रां प्रि फॉर्म्युला वन शर्यतीचे जेतेपद पटकावले. सातवेळचा चॅम्पियन लेविस हॅमिल्टनने दुसरे स्थान मिळविले.
व्हर्स्टापेनने पोल पोझिशनवरून सुरुवात केलेल्या हॅमिल्टनला पहिल्या कॉर्नरवर मागे टाकत या मोसमातील पहिले जेतेपद पटकावले. या शर्यतीवेळी पाऊसही सुरू होता. मॅक्लारेनच्या लँडो नोरिसने तिसरे, फेरारीच्या चार्लस लेक्लर्कने चौथे स्थान मिळविले. हॅमिल्टन या मोसमात आठवे जेतेपद मिळविण्याच्या मार्गावर आहे. मात्र व्हर्स्टापेन त्याच्या मार्गातील अडथळा ठरण्याची शक्यता आहे. बहरिनमधील पहिली शर्यत जिंकल्यानंतर हॅमिल्टनने रविवारी फास्टेस्ट लॅप नोंदवली. तो आता व्हर्स्टापेनपेक्षा फक्त एका गुणाने पुढे आहे. पुढील आठवडय़ात पोर्तुगाल ग्रां प्रि शर्यत होणार आहे.
मर्सिडीजचा व्हाल्टेरी बोटास व विल्यमचा जॉर्ज रसेल यांच्या कार्सची जोरदार टक्कर झाली आणि त्यांच्या गाडय़ांची अवषेश रेस ट्रकवर पसरले. त्यामुळे रेस काही वेळ थांबवण्यात आली होती. 34 व्या लॅपवेळी हा प्रकार घडला. हॅमिल्टनची गाडीही पावसाने ओलसर झालेल्या ट्रकवर घसरल्यानंतर त्याची गाडी पिटमध्ये नेण्यात आली. यावेळी अर्धा तास शर्यत थांबली होती. त्याची गाडी दुरुस्त झाल्यानंतर शर्यत सुरू झाली आणि दुसऱया स्थानावर असणाऱया हॅमिल्टनला नवव्या स्थानावरून सुरुवात करावी लागली. लेक्लर्क व नोरिस यांना मागे टाकत यावेळी व्हर्स्टापेन पुढे निघाला आणि अखेरपर्यंत आघाडी टिकवत त्याने कारकिर्दीतील 11 वे जेतेपद पटकावले. इटलीतील त्याचे हे पहिलेच जेतेपद आहे. हॅमिल्टनने तीन लॅप्स बाकी असताना नोरिसला मागे टाकत तीनवरून दुसऱया स्थानावर झेप घेतली. दीर्घ काळानंतर माझ्याकडून पहिल्यांदाच चूक झाली. पण शर्यत पूर्ण करण्यात यशस्वी ठरलो, याचे समाधान वाटते, असे हॅमिल्टन म्हणाला.









