रिजॉर्ट्ससाठी प्रसिद्ध स्ट्रैसा शहरात दुर्घटना -2 मुले गंभीर जखमी
वृत्तसंस्था / रोम
इटलीत रविवारी एका केबल कार दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. दुर्घटनेत 9 जण जखमी झाले असून यात दोन मुलांचा समावेश आहे. या दोन्ही मुलांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. ही दुर्घटना रिजॉर्ट्ससाठी प्रसिद्ध स्ट्रैसा शहरात घडली आहे. हे क्षेत्र मेगियोर सरोवरानजीक असून पिडामाँट जिल्हय़ात येते.
या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. दुर्घटनेमागे तांत्रिक बिघाड कारण असू शकते. इटलीच्या या क्षेत्रात आल्प्स पर्वतरांगा येतात. येथे जगभरातून पर्यटक येत असतात. दोन पर्वतांदरम्यान केबलकार सुविधा असून याचे अंतर 4900 फूट आहे. हे अंतर कापण्यासाठी केबल कारला सुमारे 20 मिनिटांचा वेळ लागतो.
दुर्घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दुर्घटनेवेळी केबल कार लँडिंग केबिनपासून केवळ 100 मीटर अंतरावर होती. 9 जणांना दुर्घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. तर तीन जणांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे.
याप्रकरणी प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. 2014 मध्ये या केबल कार सुविधेला देखभालीसाठी बंद करण्यात आले होते. तेव्हा देखील याच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. 2 वर्षांनी 2016 मध्ये ही सेवा पुन्हा सुरू करण्यात आली होती. पण पुढील काळात याची देखभालच करण्यात आली नव्हती.









