आरोग्य तपासणीनंतर क्वॉरंटाईनसाठी रवाना
प्रतिनिधी / वास्को
इटलीत अडकलेल्या एकूण 335 गोमंतकीय खलाशांना घेऊन दोन खास चार्टर विमाने काल बुधवारी सकाळी व संध्याकाळी दाबोळीच्या धावपट्टीवर उतरली. पहिले विमान 168 खलाशांसह तर दुसरे विमान 167 खलाशांसह दाबोळीत उतरले. तिसरे विमान मध्यरात्रीपर्यंत दाबोळीत दाखल झाले नव्हते. हे विमान काही दिवसांसाठी रद्द करण्यात आल्याची माहिती विमानतळ सुत्रांकडून उपलब्ध झाली.
इटलीत अडकलेल्या 414 गोमंतकीय खलाशांना घेऊन खास तीन विमाने गोव्यात दाखल होतील असे सरकारने जाहीर केले होते. त्यामुळे या त्यांच्या स्थानिक कुटुंबांमध्ये समाधान पसरले होते. बुधवारी सकाळी व संध्याकाळी गोव्यात दाखल झालेल्यांना पुढील चौदा दिवसांसाठी सरकारी आदेशानुसार क्वॉरंटाईन व्हावे लागले आहे.

कळंगुट, बांबोळी येथे क्वॉरंटाईन
इटलीहून मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास उड्डाण केलेल्या खास विमानातून 168 गोमंतकीय बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास दाबोळीच्या धावपट्टीवर उतरले. त्यानंतर संध्याकाळी चारच्या सुमारास दुसरे विमान 167 खलाशांना घेऊन उतरले. या प्रवाशांच्या तपासणीसाठी दाबोळी विमानतळ आवारात आरोग्य तपासणीची खास व्यवस्था करण्यात आली होती. तसेच कडक सुरक्षाही विमानतळ व आवारात ठेवण्यात आली होती. हे प्रवासी दाखल होताच परदेशगमन विभागाचे सोपस्कार तसेच कस्टम क्लिअरन्स पूर्ण होताच, त्यांचे थर्मल स्कॅनिंग व थुंकी चाचणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना गोव्यातील कळंगुट आणि बांबोळी येथे क्वॉरंटाईनसाठी पाठवण्यात आले.
खलाशांना क्वॉरंटाईनसाठी घेऊन जाण्यासाठी दाबोळी विमानतळाच्या आवारात विमानांचे आगमन होण्यापूर्वीच 9 कदंब बसगाडय़ा सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. या प्रत्येक बसगाडीमध्ये 20 प्रवाशांना बसण्याची मुभा देण्यात आली होती. दुपारी साडे तीन वाजता पोलीस सुरक्षेसह या कदंब बसगाडय़ा नियोजित स्थळांकडे त्यांना घेऊन रवाना झाल्या. आरोग्य तपासणी व इतर प्रक्रियेसाठी हे खलाशी सुमारे सहा तास दाबोळी विमानतळावर अडकले होते. संध्याकाळी दाखल झालेल्या विमानातील खलाशांना कदंबच्या आठ बसगाडय़ांमधून उत्तर व दक्षिण गोव्यातील किनारी पर्यटन स्थळांकडे क्वॉरंटानईनसाठी नेण्यात आले.
खलाशांच्या विलगीकरणाचा :खर्च सरकारने करावा :फालेरो
प्रतिनिधी / पणजी

माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात विदेशातून येणाऱया खलाशी व इतर गोमंतकीयांना गोव्यात आणल्यानंतर त्यांच्या विलगीकरणाचा खर्च त्यांच्याकडून वसूल न करता हा खर्च सरकारने करावा, अशी मागणी केली आहे.
नावेलीचे आमदार लुईझिन फालेरो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या सदर पत्राची एक प्रत राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनाही पाठवलेली आहे. सध्या जागतिक पातळीवर कोविड 19 मुळे विदेशातील अनेक गोमंतकीयांवर बेरोजगारी आलेली आहे. अनेकांना मनस्ताप होतोय. अनेकांची आर्थिक परिस्थिती बिघडलेली आहे. यामुळे अशा या नागरिकांकडून भारतात विशेषतः गोव्यात पोहोचल्यावर त्यांच्या विलगीकरणासाठी येणारा खर्च त्यांच्याकडून वसूल करून घेणे हा त्यांच्यावर अन्याय ठरेल. त्यामुळे हा खर्च त्यांना माफ करण्यात यावा, असे त्यांनी म्हटले आहे.









