कोरोना संकट रोखण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे यश :
रोम / वृत्तसंस्था
कोरोना विषाणूच्या थैमानामुळे हतबल झालेल्या इटलीमधून जगाला दिलासा देणारे वृत्त समोर आले आहे. इटलीतील संशोधकांनी कोरोना विषाणूचा प्रभाव नष्ट करणारी लस शोधून काढली आहे. ही लस शरीरात अँटीबॉडी तयार करून कोरोना विषाणूचा नायनाट करत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
इटलीची राजधानी रोम येथील स्पालनजानी रुग्णालयात या लसीची चाचणी करण्यात आली आहे. एका उंदिरांच्या शरीरात अँटीबॉडीज तयार करण्यात आली आणि त्यानंतर एका कोरोनाबाधित रुग्णावर लसीचा वापर करण्यात आला. या चाचणीत मानवी शरीरात अँटीबॉडी तयार होऊन कोरोना विषाणूचा नायनाट झाल्याचे आढळून आले. या रुग्णालयाने कोविड-19च्या जिनोम सिक्वेन्स आयसोलेट तयार पेले आहेत.
ही लस मानवी पेशींमधील विषाणूला निष्प्रभ करत असल्याचा दावा ताकिस या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी लुइगी औरिसिचियो यांनी केला आहे. इटलीत तयार करण्यात आलेल्या लसीच्या चाचणीचा अखेरचा टप्पा लवकरच सुरू होणार आहे. उन्हाळय़ानंतर लसीची माणसांवर चाचणी केली जाणार आहे. कोरोना विषाणू निष्प्रभ करण्याची कामगिरी करणारी ही जगातील पहिलीच लस असल्याचे स्पालनजानी रुग्णालयाने म्हटले आहे.
संशोधकांनी उंदिरांवर लसीचा प्रयोग केला असता यशस्वीपणे अँटीबॉडी विकसित झाल्याचे दिसून आले. ही अँटीबॉडी पेशींमध्ये संसर्ग करणाऱया विषाणूला नष्ट करत असल्याचे आढळून आले आहे. पाच लसींनी मोठय़ा संख्येत अँटीबॉडी तयार केल्या आणि यातील 2 लसींना सर्वोत्तम परिणामांसह निवडण्यात आले आहे. सद्यकाळात विकसित केल्या जाणाऱया सर्व लसी डीएनए प्रोटीन स्पाकच्या आनुवंशिक सामग्रीवर आधारित आहे.
लस निर्मितीचे चार टप्पे
कोराना लसीच्या निर्मितीत काही देशांनी पहिला टप्पा यापूर्वीच पूर्ण केला आहे. लसीच्या विकासानंतर त्याचे उत्पादन करणे हा पहिला टप्पा असतो. दुसऱया टप्प्यात याची चाचणी होते आणि तिसऱया टप्प्यात याला मंजुरी घ्यावी लागते. चौथ्या टप्प्यात या लसीचा रुग्णांवर प्रयोग केला जातो. हे चारही टप्पे अत्यंत महत्त्वाचे असतात. सद्यकाळात जगात लसनिर्मितीचे 150 पेक्षा अधिक प्रकल्प सुरू आहेत. यातील सुमारे 5 पेक्षा अधिक देश लसनिर्मितीच्या दुसऱया टप्प्यात पोहोचले आहेत. सर्वकाही सुरळीत राहिल्या लस 12 ते 18 महिन्यांमध्ये बाजारात येऊ शकते असे अमेरिकेच्या प्रशासनाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. अँथोनी फॉकी यांनी म्हटले आहे.









