वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
इटली या देशाने शुक्रवारी भारत उत्पादीत कोव्हिशिल्ड या लसीला मान्यता दिली आहे. त्यामुळे कोव्हिशिल्डचे दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र असणाऱया व्यक्तीला इटलीचा ग्रीन पास मिळणे शक्य होणार आहे. ग्रीन पास असल्यास इटलीतून इतर युरोपियन देशांना जाणेही शक्य होणार आहे.
ब्रिटननेही कोव्हिशिल्डला मान्यता दिली असली तरी कोविन प्रमाणपत्राला मान्यता दिलेली नाही. त्यामुळे भारतात कोविन प्रमाणपत्र मिळविलेल्या व्यक्तीस ब्रिटनमध्ये आठ दिवसांच्या विलगीकरणाशिवाय प्रवेश मिळू शकणार नाही, असे सांगण्यात आले आहे. भारताने ब्रिटनच्या या धोरणाची निंदा केली असून ब्रिटिश नागरिकांवरही भारतात अशाच प्रकारचे निर्बंध लादण्यात येतील, असा इशारा दिला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मन्सुख मांडविया यांनी इटलीचे आरोग्यमंत्री रॉबर्टो पेरांझा यांच्याशी शुक्रवारी सकाळी टेलिफोनवरून चर्चा केली. त्यानंतर कोव्हिशिल्डचा इटलीतील मार्ग मोकळा झाला. आता इटलीला कोव्हिशिल्डशी निर्यात करणेही शक्य होणार आहे. ऑक्टोबरपासून ही निर्यात पुन्हा सुरू केली जाईल, असे सिरम इन्स्टिटय़ूटने गुरुवारी घोषित केले होते.









