वृत्तसंस्था/ पुणे
इजिप्तमध्ये रविवारी झालेल्या 15000 डॉलर्स एकूण बक्षीस रकमेच्या आयटीएफ महिलांच्या टेनिस स्पर्धेत पुण्याची 24 वर्षीय महिला टेनिसपटू ऋतुजा भोसलेने एकेरीचे अजिंक्यपद पटकाविले. गेल्या तीन वर्षांच्या कालावधीतील ऋतुजाचे हे पहिले विजेतेपद आहे.
कोरोना महामारीमुळे संपूर्ण देशात झालेल्या लॉकडाऊननंतर ऋतुजाची ही पहिली स्पर्धा होती. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात ऋतुजाने झेक प्रजासत्ताकच्या ऍना सिसकोव्हाचा 6-2, 7-5 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. महिला टेनिसपटूंच्या मानांकन यादीत ऋतुजा सध्या 451 व्या स्थानावर आहे. 2017 साली तिने दोन स्पर्धा जिंकल्या होत्या. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऋतुजाला आपल्या प्रवासामध्ये बरेच झगडावे लागले. व्हिसा प्रक्रियेमुळे तिला भारतातून इजिप्तला जाण्यासाठी 59 तास हवाई प्रवासामध्ये राहावे लागले.









