इचलकरंजी / प्रतिनिधी
इचलकरंजी येथे पंचगंगा नदीमध्ये पोहत असताना एक युवक बुडाला. रविंद्र पांडुरंग शिंदे (वय 48, रा. राजीव गांधीनगर, यड्राव, ता. शिरोळ ) असे त्यांचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली. बुडालेल्या शिंदेचा मृतदेह स्थानिक पाणबुडे आणि नगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे जवानाच्यांकडून नदीत शोध मोहिम हाती घेण्यात आली आहे.
घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी, रविंद्र शिंदे शुक्रवारी सकाळी घरच्याबरोबर येथील पंचगंगा नदीमध्ये धुणे धुण्यासाठी आला होता. याच दरम्यान तो पोहण्यासाठी नदीत उतरला. तो नदीच्या मध्यापर्यंत गेला असता त्याला धाप लागल्याने गटांगळ्या खाऊ लागला. हा प्रकार त्याच्या घरचांच्या निदर्शनास येताच त्यांनी आरडा-ओरड सुरू केली.
यावेळी नदी घाटावरील काही युवक त्याच्या मदतीला धावले.
पण हे युवक त्यांच्या पर्यंत पोहचेपर्यंत तो बुडाला. या घटनेची माहिती समजताच पोलीस व नगर पालिकेचे अग्निशमन दलाचे जवान त्वरीत घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी स्थानिक पाणबुड्यांच्या मदतीने बुडालेल्या शिंदेचा शोध घेण्यासाठी मोहिम सुरू केली. पाच तासाहून अधिक वेळ लोटला असला तरीही त्याला शोधण्यास अद्यापी यश आले नाही. नदी घाटावर शिंदेच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली आहे.









