प्रतिनिधी/इचलकरंजी
कोले मळा परिसरातील जेष्ठ नागरिकाला कोरोनाची लागण झाली असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. 17 एप्रिल रोजी या व्यक्तीचा स्वॉब तपासणीसाठी घेतला होता. त्याचा पॉझिटिव्ह अहवाल आला आहे. त्यामुळे इचलकरंजीत प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन प्रतिबंधक उपाययोजनांसाठी कंबर कसली आहे. कोले मळा परिसरसह वस्त्र नगरी इचलकरंजीचे धाबे दणाणले आहेत.
कोले मळा परिसर काही दिवसांपूर्वीच सील करण्यात आला होता. यावेळी करण्यात आलेल्या प्रत्येक घरांच्या सर्वेक्षणात या व्यक्तीचा स्वाब घेण्यात आला होता. आज सकाळी प्राप्त झालेल्या या पॉझिटिव्ह रिपोर्ट मुळे या परिसरातील सॅनिटायझरिंग व स्वच्छतेच्या कामाला अधिक गती देण्यात आली असून या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांची चौकशी करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याची माहिती पालिकेचे आरोग्यधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार यांनी दिली आहे.