प्रतिनिधी / इचलकरंजी
दोन अल्पवयीन युवकांच्या मदतीने दुचाकी आणि मोबाईल स्नॅचिंग करणाऱ्या पोलीस रेकॉर्डवरील एका गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून एक मोबाईल, दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. राजू अल्लाऊद्दीन नाईकवाडे (वय २८, मुळ रा. तीन बत्ती चौक, इचलकरंजी, सध्या रा. अब्दुललाट, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) असे अटक केलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराचे नाव आहे. त्याला पोलिसांनी न्यायालयात हजर केले. त्यावेळी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली. ही कारवाई शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर इचलकरंजी व परिसरातून दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. त्यामुळे अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, पोलीस उपाअधीक्षक बाबूराव महामुनी यांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर पाळत ठेवण्याबाबत आदेश दिले होते. त्यानुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक हद्दीत गस्त घालीत होते. त्यावेळी या पथकाला रेकॉर्डवरील गुन्हेगार राजू नाईकवाडे जुना चंदूर रोडवर दुचाकीवरुन संशयास्पद फिरत असताना मिळून आला. त्याच्याकडे चौकशीत तो वापरत असलेली दुचाकीसह अन्य दोन अशा तीन दुचाकीची चोरी केल्याचे सांगितले. त्यावरुन त्यांच्याकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहे. तर एका चोरीच्या दुचाकीचा पोलिसांनी शोध सुरु केला आहे.
याच दरम्यान, त्यांच्याकडे अधिक चौकशीत त्याने दोन अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने शहरातील गुरु टॉकीजनजीक ६ ऑक्टोबर रोजी दुचाकीवर बसून मोबाईलवर बोलत असलेल्या व्यक्तीच्या हातातील मोबाईल हिसकावून घेवून पोबारा केल्याची माहिती दिली. त्यावरुन या लुटमारीच्या गुन्ह्याचा तपास करुन त्यातील मोबाईल हॅण्डसेट देखील पोलिसांनी जप्त केला. या कारवाईत गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद मगर, कॉन्स्टेबल रफिक पाथरवट, उदय पाटील, प्रशांत ओतारी, प्रकाश कांबळे, महेश पाटील, विजय माळवदे, अविनाश भोसले आदींनी भाग घेतला.
––––––––-
चैनी आणि दुचाकी पळविण्याच्या हौशेखातर चोऱ्या राजू नाईकवाडे हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्यांच्यावर
चोरीचे इचलकरंजीमधील गावभाग, शिवाजीनगर आणि कुरुंदवाड या तीन पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद आहेत. तो चैनी आणि दुचाकी पळविण्याच्या हौशेखातर चोऱ्या करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर त्यांच्याबरोबर मोबाईल स्नॅचिंगच्या गुन्ह्यात ताब्यात घेतलेले ते दोन अल्पवयीन युवक पहिल्यांदा पोलिसांच्या रेकॉर्डवर आले आहेत.
Previous Articleकार्तिकी एकादशीच्या उत्सावाला सशर्त परवानगी
Next Article सातारा जिल्ह्यात बाधितांची संख्या 50 हजार पार









