प्रतिनिधी / इचलकरंजी
येथील जूना चंदूर रोडवरील श्री दुर्गामाता मंदिरालगत असणाऱया एअरजेट लूमच्या कारखान्याला मंगळवारी रात्री शॉर्टसर्किटने आग लागली. आगीत 6 एअरजेटलुम, सुताचे बिमे, कापड यासह अन्य साहित्य जळून खाक झाल्याने सुमारे 1.75 कोटीचे नुकसान झाले आहे. स्थानिक युवक आणि नगरपालिकेच्या अग्निग्नशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.
येथील जुना चंदूर रोडवर अरुण बाहेती यांचा प्रियालक्ष्मी टेकस्टाईल निंबार्क मिल्स नावाचा एअरजेट लुम कारखाना आहे. उत्तरीय बाजूस असलेल्या इमारतीमधील एअरजेट लुमला मंगळवारी रात्री शॉर्टसर्किटने अचानक आग लागली. कामगारांनी यांची माहिती राज्य विद्युत महावितरण कंपनी, नगरपालिकेच्या अग्निशमन दल आणि कारखान्याचे मालक बाहेती यांना दिली. विद्युत महावितरण कंपनीने या भागातील विद्युत पुरवठा त्वरीत खंडीत केला. तर नगरपालिकेच्या अग्निग्नशमन दलाचे दोन पाण्याचे बंब आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. तोपर्यत आगीने रौद्ररूप धारण केल्याने आगीच्या ज्वालाबरोबर धुराचे लोट बाहेर येवू लागले. त्यामुळे मदतकार्यात अडथळा येऊ लागल्याने, स्थानिक युवकाच्या मदतीने जवानांनी कारखान्याच्या छतावर चढून पत्रे फोडून धुराला वाट करून दिली. त्यानंतर केलेल्या दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग विझवण्यात यश आले. आगीत 3 एअरजेट लुमचा कोळसा झाला. तर अन्य 3 लुमचे मोठे नुकसान झाले. सुताचे बिम, कापड आणि कारखान्यातील अन्य साहित्य जळुन खाक झाल्याने सुमारे पावणेदोन कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.









