वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्यासह पोलीस कर्मचाऱ्यात खळबळ
गुन्हेगारावर बेकायदेशिर अग्निशस्त्र बाळगल्याचा गुन्हा
इचलकरंजी / प्रतिनिधी
बंदोबस्तावरील महिला पोलिसांच्याबरोबर हुज्जत घालीत एका महिला कॉन्स्टेबलच्या अंगावर धाव गेल्याप्रकरणी पोलिसांनी शहरातील रेकॉर्डवरील एका गुन्हेगाराला अटक केली. महेश आप्पासो माळी ( रा. लिगाडे मळा , जवाहरनगर , इचलकरंजी ) असे त्याचे नाव आहे. त्याला अटकेनंतर येथील आयजीएम रुग्णालयात नियमित वैद्यकिय तपासणीसाठी नेण्यात आले. त्यावेळी तो वैद्यकिय तपासणीमध्ये कोरोना पॉझीटीव्ह असल्याचे उघड झाले. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांच्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
गुन्हेगार महेश माळी याच्याविरोधी शिवाजीनगर पोलिसात बेकायदेशिरपणे अग्निशस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा नोंद आहे. या गुन्ह्यात तो काही दिवस कारागृहाची हवा खाऊन तो जामिनावर बाहेर आला आहे. हा गुन्हा सध्या न्यायप्रविष्ठ आहे. हा गुन्हेगार वाढत्या कोरोनामुळे सरकाराने जाहिर केलेल्या लॉकडाऊनमध्ये मास्क न घालता विनाकारण शहरातील रस्त्यावरुन मोपेड घेवून फिरत होता. त्याला तपासणी नाक्यावरील पोलिसांनी पथकाने पकडले. यावेळी त्यांने तपासणी नाक्यावरील पोलिसांच्याबरोबर चांगलीच हुज्जत घालीत एका महिला कॉन्स्टेबलच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
अटकेनंतर त्याला नियमित वैद्यकिय तपासणीसाठी त्याला आयजीएम रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी तो वैद्यकिय तपासणीत कोरोना पॉझीटीव्ह असल्याचे समोर आले. त्यावरून या गुन्हेगाराच्या संपर्कात आलेल्या वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्याबरोबर पोलीस कर्मचाऱ्यात एकच खळबळ उडाली आहे.