टाळ्यांच्या गजरात फुलांचा वर्षाव करत पाठवणी
प्रतिनिधी/इचलकरंजी
येथील कोरोनाबाधीत ४ वर्षाच्या बालकावर यशस्वीरित्या उपचार करून आयजीएम रुग्णालयातुन सोडण्यात आले. यावेळी डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी आणि शासकीय अधिकारी यांनी टाळ्या वाजवत, फुलांचा वर्षाव करत आनंद व्यक्त केला. येथील रुग्णालयातून कोरोनामुक्त होऊन जाणारा हा पहिला रुग्ण आहे.
शहराच्या कोले मळा भागात हे बालक आईवडील, आजोबासमवेत राहत आहे. ६० वर्षीय आजोबाला कोरोनाची बाधा झाली होती. पॉझिटिव्ह अहवाल आल्यामुळे त्यांना कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचे निधन झाले. त्यांच्या ४ वर्षीय नातवाची तपासणी केली असता पॉझिटिव्ह आढळून आला. यामुळे त्याला इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात १४ दिवस उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय अधीक्षक डॉ. आर. आर. शेट्ये यांच्या नेतृत्वाखाली डॉ. संदीप मिरजकर, डॉ. शोयेब मोमीन तसेच नर्स फगरे यांच्यासह इतरांनी आत्मीयतेने प्रयत्न केले. त्याचा अहवाल निगेटिव्ह मिळाल्यानंतर सन्मानपूर्वक रुग्णालयातुन पाठवणी केली. यावेळी प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, पोलीस उपाधीक्षक गणेश बिरादार, आयजीएमचे डॉ. आर. आर. शेट्ये, मुख्याधिकारी दीपक पाटील, आरोग्यधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार, डॉ. श्रीकांत सूर्यवंशी यांच्यासह रुग्णालयाचा कर्मचारी वर्ग व डॉक्टर उपस्थित होते.
आज ५ वाजण्याच्या दरम्यान रूग्णालयातील अधिकारी-कर्मचारी यांनी टाळ्यांच्या गजरात आणि फुलांच्या वर्षावात बालकाला निरोप दिला. यावेळी या बालकाला तसेच त्याच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय पथकाचे पुष्पगुच्छ देवून कौतुक केले. जोरदार टाळ्या वाजवून पाठवनी करतांना अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. कोरोनाबाधीत रुग्ण असलेले हे बालक कोरोनामुक्त झाल्याचा हा शहरातील पहिलाच रुग्ण ठरला आहे. त्यामुळे शहरवासीयांतुन समाधान व्यक्त होत आहे.








