प्रतिनिधी / इचलकरंजी
प्रसिध्द उद्योगपती, ना.बा. एज्युकेशन सोसायटीसह अनेक संस्थांचे पदाधिकारी, स्वदेशी उद्योग समुहाचे संस्थापक मदनलाल बोहरा यांचे (वय 89) सोमवारी निधन झाले. ते शेठजी म्हणून परिचित होते. त्यांच्या पत्नी गितादेवी यांचे काल 2 मे रोजी तर आज मदनलालजी यांचे निधन झाल्याने शहरात शोककळा पसरली आहे.
राजस्थानमधील नागौर जिल्ह्यातील नेणिया या खेड्यात मदनलालजी यांचा 7 ऑक्टोंबर 1932 रोजी जन्म झाला. वयाच्या 10 व्या वर्षी त्यांचे मातृछत्र हरपले आणि दुष्काळ पडल्याने ते राजस्थानमधून बाहेर पडले. झुमरलालजी बोहरा यांनी लातुर येथे मदनलालजी यांना मराठी माध्यमाच्या शाळेत दाखल केले व पाचवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. कुटुंबाच्या जबाबदारीमुळे 16 व्या वर्षी ते शिक्षण सोडून नोकरीच्या शोधात इचलकरंजीत दाखल झाले. आसारामजी बोहरा यांच्या सोबत त्यांनी व्यापाराचे धडे घेतले. 12 वर्षे नोकरी करून त्यांनी 1961 मध्ये भागीदारीमध्ये स्वदेशी प्रोसेस सुरू केली. दर्जेदार कापड प्रोसेसिंग व व्यवहारकुशलतेमुळे प्रोसेसची भरभराट झाली व शहरातील एक अग्रगण्य प्रोसेस असा नावलौकिक मिळवला.
प्रामाणिकपणा, जिद्द, चिकाटी आणि सर्व काही शिकण्याच्या उर्मीमुळे ते शेठजी बनले. वस्त्रनिर्मिती, वस्त्रप्रक्रिया, वस्त्रव्यापार या क्षेत्रामध्ये त्यांनी अफाट यश संपादन केल्याने वस्त्रोद्योगातील सर्व यशस्वी व्यक्तींमध्ये त्यांचा नामोल्लेख अवर्जुन केला जातो. इचलकरंजी कापड मार्केट आणि मदनलालजी बोहरा कापड मार्केट हे 2 आधुनिक प्रकल्प बोहरा यांच्या कर्तृत्वाची साक्ष देणारे आहेत.
1980 पासून त्यानी श्री. ना.बा.एज्युकेशन सोसायटीची धुरा सांभाळत असून शहराच्या या मातृसंस्थेला यशोशिखरावर पोहोचवले. त्यांनी व्यंकटेश महाविद्यालय, श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायसकूल, गोविंदराव हायस्कूल, गोविंदराव व्यवसाय शिक्षण विभाग, काकासो कांबळे शाखेचा तिसरा मजला, श्री.ना.बा.बाल विद्यामंदिर या शाखांच्या भव्य, सुसज्ज आणि देखण्या इमारती बांधल्या. या इमारतीमधून हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पारीख समाज आणि राजस्थानी समाज संघटनांच्या माध्यमातून शेठजींनी कार्याचा डोंगर उभारला आहे. पुष्कर या तिर्थक्षेत्री अखिल भारतवर्षीय पारीख आश्रमाची भव्य वास्तु उभारण्यातही त्यांचा सिंहाचा वाटा आहे. हरिद्वार येथेही अखिल भारतवर्ष पारीक समाज चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षपदाची धुराही त्यांनी यशस्वीपणे सांभाळली.
Previous Articleअमिताभ चौधरी ऍक्सिस बँकेचे एमडी
Next Article प्रादेशिक पक्ष देश जिंकतील?









