आमदार प्रकाश आवाडे यांच्यासमवेत केली पाहणी : नदीसह काळा ओढयातील पाण्याचे घेतले नमुने
प्रतिनिधी/इचलकरंजी
येथील पंचगंगा नदी व काळा ओढयाची पाहणी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड यांनी केली. यावेळी त्यांच्यासमवेत आमदार प्रकाश आवाडे होते. दोन्ही ठिकाणच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले असून काळा ओढय़ातील पाण्याचा काळसरपणा कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे.
कोरोना प्रार्दूभावाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे. यामुळे इचलकरंजी शहरात महिनाभरापासून अत्यावश्यक सेवा वगळता इतर अन्य सेवा, कारखाने , यंत्रमाग, प्रोसेस आदी व्यवसाय बंद ठेवण्यात आले आहेत. परिणामी शहर आणि परिसरातील पाणी, ध्वनी, हवा प्रदुषणाचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात शनिवार 25 रोजी प्रदुषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड व क्षेत्रीय अधिकारी सचिन हारभट यांनी पंचगंगा नदी आणि टाकवडे वेस परिसरातील काळ्या ओढय़ाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत आमदार प्रकाश आवाडे उपस्थित होते.
पंचगंगा नदीत पात्राच्या पाहणीत पाणी प्रदूषण कमी झाल्याचे दिसून आले. अधिकाऱयांनी नदीतील पाण्याचे नमुने तपासणी घेतले. त्यानंतर टाकवडे वेस येथील काळा ओढा येथे पाहणी केली. यावेळी काळ्या ओढय़ातील पाणी बादलीत घेऊन पाहिले असता पाणी गढूळ असले तरी त्यातील काळसरपणा कमी असल्याचे दिसून आले. दोनही ठिकाणी घेतलेले पाण्याचे नमुने शिवाजी विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत.








