प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात कोरोनामुळे सोमवारी आणखी एकाच बळी गेला. इचलकरंजीतील गावभाग परिसरातील वृद्धाचा सीपीआरमध्ये मृत्यू झाला. हा इचलकरंजीतील दुसरा तर जिल्ह्यातील ११ वा कोरोना बळी आहे.
दरम्यान, आणखी आठ नवे रूग्ण आढळले. यामध्ये शहरातील मुक्त सैनिक वसाहतीतील दाम्पत्य आणि फुलेवाडी रिंगरोड परिसरातील महिलेचा समावेश आहे.
इचलकरंजी गावभाग परिसरात खळबळ
येथील त्रिशुल चौक, अवधुत आखाडा येथील ६५ वर्षीय वृध्दाला सोमवारी सकाळी उपचारार्थ सीपीआरमध्ये दाखल केले होते. त्याचा स्वॅब घेण्यात आला होता. याचा दुपारी मृत्यू झाला.
शहरात तीन नवे रूग्ण
जिल्ह्यात आज अखेर ७१६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सद्यस्थितीत १०८ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. सोमवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये मुक्त सैनिक वसाहतीतील ५५ वर्षीय पुरूष, ५० वर्षीय महिला, फुलेवाडी रिंगरोड परिसरातील तामजाई कॉलनीतील 34 वर्षीय महिला, अडकूर ता. चंदगढ येथील ६४ वर्षीय महिला, इचलकरंजीतील गुरुनानक नगर येथील ३९ वर्षीय पुरुष, जुना चंदूर रोड येथील ४५ वर्षीय महिला, कुडचे मळा येथील १४ वर्षीय मुलगा व पाच वर्षीय बालकाचा समावेश आहे.








