वृत्तसंस्था/ क्वीटो
इक्वेडोर या दक्षिण अमेरिकन देशाचे अध्यक्ष लेनिन मोरेनो यांनी लैंगिक शोषणासंबंधी वादग्रस्त टिप्पणी केली आहे. आरोपी शारीरिक दृष्टय़ा आकर्षक नसल्यास महिला अशा प्रकरणांमध्ये लैंगिक शोषणाची तक्रार करत असल्याचे धक्कादायक विधान मोरेनो यांनी केले होते. देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान व्यक्तीच्या या विधानावर इक्वेडोरच्या जनतेने तीव्र आक्षेप घेतला होता. याप्रकरणी जनक्षोभ पाहता मोरेनो यांनी अखेर माफी मागितली आहे.
पुरुषांवर शोषणाच्या आरोपाचा धोका घोंगावत असतो. कुरुप व्यक्तीने दुष्कृत्य केले असेल तरच त्याला गुन्हा म्हटले जाते. पण संबंधित इसम आकर्षक असल्यास दुष्कृत्याला गुन्हा मानले जाईलच असे नाही असे मोरेनो यांनी म्हटले होते. त्यांच्या या विधानावर महिला अधिकार कार्यकर्त्यांसह देशभरातील सर्वच घटकांनी आक्षेप घेतला आहे.
चौफेर टीका झाल्यावर मोरेनो यांनी ट्विटरवर निवेदन प्रसिद्ध करत माफी मागितली आहे. शोषणासंबंधी माझ्या टिप्पणीत हिंसा किंवा दुष्कृत्यासारख्या गंभीर विषयाला कमी लेखण्याचा हेतू नव्हता. पण विधानातून तसा अर्थ निघाला असल्यास मी माफी मागतो. महिलांच्या विरोधातील कुठल्याही प्रकारच्या हिंसेला विरोध करत असल्याचे मोरेनो यांनी म्हटले आहे.









