ऑनलाईन टीम / क्विटो :
इक्वाडोरमधील सर्वात मोठा तुरुंग असलेल्या लिटोरल पेनिटेंशरीमध्ये ड्रग्ज माफियांच्या दोन गटात सशस्त्र राडा झाला. यावेळी झालेल्या गोळीबारात 68 कैद्यांना आपला जीव गमवावा लागला. तर 25 जण जखमी झाले आहेत.
गुआस प्रांताचे गव्हर्नर पाब्लो अरोसेमेना घटनेबाबत माहिती देताना म्हणाले की, इक्वाडोरच्या गुआयाक्विल शहरात असलेल्या लिटोरल पेनिटेंशरी तुरूंगात आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटशी संबंधित असलेले कैदी ठेवण्यात आले आहेत. शनिवारी कैद्यांच्या दोन गटामध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर यांच्यात सशस्त्र राडा झाला. ही धुमश्चक्री तब्बल 8 तास चालली. यावेळी झालेल्या गोळीबारात 68 कैदी मारले गेले. तर 25 जण जखमी झाले. या प्रकारानंतर बराचवेळ तुरुंगातील परिस्थिती नियंत्रणाबाहेर होती. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये काही मृतदेह जळालेले तर काही तुरुंगातील जमिनीवर पडलेल्या अवस्थेमध्ये होते.
कैद्यांनी आरडीएक्सचा वापर करून भिंत उडवण्याचा प्रयत्न केला. जवळपास सातशे पोलिसांच्या मदतीने पुन्हा एकदा तुरुंगातील परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात आल्याचे अरोसेमेना यांनी सांगितले.









