शिथिलता मिळूनही मागणीवर कोरोनाचा प्रभाव
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतामधील इंधनाची मागणी पूर्वपदावर येण्यास आणखी सहा ते नऊ महिन्याचा कालावधी लागण्याचे संकेत आहेत. या संदर्भात इंडियन ऑईल कॉर्पोरेशन(आयओसी) चे वित्त संचालक एस. के. गुप्ता यांनी माहिती दिली आहे. सध्या अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग दिवसागणिक वाढत असल्याचे पहावयास मिळत आहे. तर दुसऱया बाजूला याला आळा बसावा यासाठी लॉकडाऊनची घोषणा केली जात असल्याचाही प्रभाव इंधन मागणीवर पडल्याची माहिती आहे.
कोरोनाच्या प्रभावामुळे देशव्यापी लॉकडाऊनच्या दरम्यान एप्रिलमध्ये पेट्रोल डिझेलची मागणी 45.8 टक्क्यांनी घसरली होती. परंतु यातील निवडक राज्यांनी मात्र आपली टाळेबंदी कायम ठेवल्याच्या कारणास्तव लॉकडाऊन कायम ठेवला असल्याने आवश्यक तितकी इंधनाची मागणी झालेली नाही.
वित्त वर्ष 2020-21 मध्ये 26,233 कोटी रुपयांचे भांडवल इंधन योजनेसाठी देण्यात आले आहे. यातील जवळपास 4,200 कोटी रिफायनरी आणि पाईपलाईन खर्च योजना, तर मार्केटिंग आणि पायाभूत सुविधांसाठी 2200 कोटी रुपये आणि पेट्रोकेमिकल्स योजना आणि समूह कंपन्यांवर 5000 कोटी रुपयांचा खर्च करण्याची योजना आखण्यात आल्याची माहिती आहे.









