प्रतिनिधी / कोल्हापूर
पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीच्या निषेधार्थ भाकपच्या वतीने मध्यवर्ती बसस्थानक चौकात निदर्शने करण्यात आली. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. भरपावसात हे आंदोलन सुरु होते. मध्यवर्ती बसस्थानका समोर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले. रिकामे गॅस सिलेंडर उलटे ठेवून त्याचा स्टँड बनवून त्यावर चूल पेटवून ठेवून त्यावर चपाती भाजून अभिनव पद्धतीने हे आंदोलन करण्यात आले.
यावेळेस जिल्हा सेक्रेटरी सतीशचंद्र कांबळे म्हणाले, सर्वसामान्यांचे जगणे सुकर व्हावे यासाठी महागाईचा निर्देशांक आटोक्यात ठेवणे, हे सरकारचे आद्य कर्तव्य असते. परंतु, याउलट सरकारने ज्यामुळे महागाई वाढते, त्या पेट्रोल व डिझेलबाबत मुक्त बाजारपेठेचे धोरण अवलंबलेले आहे. त्यामुळे ऐन दसरा, दिवाळीच्या काळात पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडलेले आहेत. दरवाढ तातडीने मागे घ्यावी, अशी मागणी केली.
शहर सेक्रेटरी रघुनाथ कांबळे म्हणाले, गॅसवरील अनुदान जवळपास सरकारने काढूनच टाकलेले आहे. सदरचे अनुदान बँक खात्यावर जमा होईल, अशी भूलथाप मोदी सरकारने मारलेली होती. थोडे दिवस ते जमा झाले देखील. पण त्यानंतर आता अनुदानाचे पैसे सर्वसामान्य जनतेला मिळत नाहीत व दुसर्या बाजूला गॅसची दरवाढ प्रचंड झालेली आहे. ती ताबडतोब कमी व्हायलाच पाहिजे. अन्यथा सर्वसामान्य जनतेसाठी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
राज्य सेक्रेटरी नामदेव गावडे यांनी केंद्र सरकराचा निषेध केला. दिलीप पवार, प्राध्यापिका सुनीता अमृतसागर, शोभना कांबळे, इर्शाद फरास, एस.बी पाटील, सिद्धार्थ कांबळे, बाळू पवार, समीर देसाई, गौतम कांबळे, अजय एकबोटे, इस्माईल सय्यद, विजय जेधे, महेश मस्के, दिलदार मुजावर मधुकर माने आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.









