सोलापूर / प्रतिनिधी
पेट्रोल डिझेल, इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेस भवन येथे सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने सोलापुर शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या नेतृत्वाखाली इंधन दरवाढी विरोधात ‘थेंब थेंब पेट्रोल वाटप’ करुन आज, गुरुवारी आंदोलन केले.
यावेळी शहर अध्यक्ष प्रकाश वाले म्हणाले, केंद्रातील मोदी सरकारने इंधनाच्या दरात प्रचंड दरवाढ केली आहे. भविष्यात असेच इंधन दरवाढ होत राहिली तर नागरिकांना गरजेपुरते थेंब थेंब, किंवा 50 एमएल किंवा एमएल पेट्रोल घ्यावे लागेल.
2014 साली मोदी सरकारने 30 ते 35 रुपये दरात पेट्रोल देऊ म्हणून आश्वासन दिले होते. परंतू सध्या पेट्रोलचे दर 85 रुपये, डिझेलचे दर 76 रुपये झाले आहेत. गेल्या नऊ-दहा दिवसात नऊ वेळा पेट्रोल डिझेल, इंधनाच्या दरात वाढ केली आहे. यामुळे पेट्रोलियम कंपन्यांना लाखो रुपये फायदा होत आहे. तर जनतेचा खिसा खाली होत आहे. वास्तविक पाहता जागतिक बाजारपेठेत इंधनाचे प्रती बॅरलचे दर चाळीस डॉलर इतके ऐतिहासकरित्या कमी झाले आहेत. तेच दर 2014 साली काँग्रेस सरकारच्या काळात एकशे दहा ते एकशे चाळीस डॉलर प्रति बॅरलच्या आसपास होते. जनतेला वाटले की आत्ता पेट्रोल डिझेल, इंधनाचे दर कमी होतील पण केंद्र सरकार इंधनाचे दर कमी करण्याऐवजी इंधनावर कर वाढवून दरवाढ करत आहे. संपूर्ण देशात एकीकडे कोरोनाचा कहर सुरु असुन उद्योगधंदे ठप्प आहेत.
रोजगाराचा पत्ता नाही, महागाई प्रचंड वाढली, शेतीमालाला बाजारपेठ व भाव नाही, देशातील सप्लाय चेन आधीच अडचणीत असुन या इंधन दरवाढी मुळे वाहतूक दरात वाढ होऊन अजुन प्रचंड महागाई वाढणार आहे. रोजगार नसल्यामुळे जनतेचा खिसा रिकामा असून केंद्र सरकार इंधन दरवाढ करुन जनतेला लूटत आहे. या दरवाढी मुळे गोरगरीब, मध्यमवर्गीय, शेतकरी, व्यापारी, सर्वसामान्य जनतेचे जगणे कठिण झाले असुन इंधन दरवाढ कमी करावी म्हणून केंद्रातील मोदी सरकारचा निषेध करुन इंधन दरवाढ कमी करावी अशी मागणी करत आहोत.
यावेळी ईमेल द्वारे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना निवेदन पाठवण्यात आले. आंदोलनावेळी युवक काँग्रेस शहर अध्यक्ष अंबादास करगुळे, प्रदेश सरचिटणीस नगरसेवक विनोद भोसले, परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, मध्य अध्यक्ष योगेश मार्गम, उत्तर अध्यक्ष विवेक कन्ना, प्रवीण जाधव, राजासाब शेख, सुभाष वाघमारे, शरद गुमटे, रोहित भोसले, योगी देशपांडे आदि उपस्थित होते.
Previous Articleसलून, ब्युटीपार्लर व्यवसाय अजूनही दखलहीन
Next Article सोयाबीन खरेदीत अल्पभूधारक शेतकऱ्यांना अनुदान









