नवी दिल्ली/प्रतिनिधी
गेले काही दिवस दररोज इंधन दर वाढ होत आहे. इंधनाचे दर वाढल्याने सामान्य जनता चांगलीच त्रस्त आहे. त्यामुळे विरोधी पक्षांसह सर्व स्तरातून सत्ताधारी भाजप सरकारवर टीका होत आहे.
इंधन दरवाढीचा प्रश्न जटिल व मनस्तापाचा असून इंधनाच्या किमती कमी करण्याशिवाय त्यासाठी कुठलेच समाधानकारक उत्तर असू शकत नाही. त्यामुळे या मुद्द्यावर केंद्र व राज्य सरकार यांनी चर्चा करून इंधनाची किरकोळ किंमत कमी करण्यासाठी तोडगा काढावा, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी म्हटले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर आधीच्या सरकारांना जबाबदार ठरवताना आयात इंधनावर देशाचे अवलंबित्व वाढवल्याने ही वेळ आल्याचे म्हटले होते. पंतप्रधान मोदी यांनी तमिळनाडूतील एका कार्यक्रमात हे वक्तव्य केलं.
इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर मध्य प्रदेशात काँग्रेस कार्यकत्र्यांनी अर्ध्या दिवसाचा बंद पाळला. माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी, की पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीने लोकांच्या समस्या वाढल्या आहेत. सरकार महसूल गोळा करण्यात मश्गूल आहे. त्यांना लोकांच्या भावनांची काहीच काळजी नाही, असे म्हंटले आहे. शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी, इंधन दरवाढीतील पैसा कोठे जातो आहे? हा पैसा पश्चिम बंगालमध्ये तर जात नाही ना? असा सवाल त्यांनी केला आहे.