परिवहनला इंधनाच्या वाढत्या किमतीचा फटका : परिवहन आर्थिकदृष्टय़ा अडचणीत
प्रतिनिधी / बेळगाव
अनलॉकनंतर सुरू झालेल्या बससेवेला प्रवाशांचा प्रतिसाद वाढत आहे. विविध ठिकाणी परिवहनच्या बसेस धावत आहेत. मात्र इंधनाच्या किमतीत भरमसाट वाढ झाल्याने परिवहन मंडळाच्या बससेवेवर परिणाम झाला आहे. प्रवाशांच्या संख्येनुसार बसफेऱया वाढल्या आहेत. त्या प्रमाणात इंधनाची देखील मागणी वाढली आहे. त्यामुळे इंधनाच्या वाढत्या किमतीचा फटका परिवहनला बसत आहे.
कोरोनामुळे मागील दोन वर्षात परिवहनला 145 कोटीचा फटका बसला आहे. त्यामुळे परिवहन आर्थिकदृष्टय़ा अडचणीत सापडले असून कर्मचाऱयांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. वेळेत वेतन मिळत नसल्याने कर्मचाऱयांसमोर अडचणी निर्माण होत आहेत. याकरिता परिवहनमार्फत महसूल वाढीसाठी वेगवेगळय़ा पद्धतीने उपाय हाती घेण्यात येत आहेत. मात्र आता इंधन दरवाढीचा बससेवेवर परिणाम होत आहे.
मध्यवर्ती बसस्थानकातून स्थानिक बसेससह लांब पल्ल्यासाठी विविध मार्गावर बससेवा पूर्ववत सुरू झाली आहे. त्यामुळे महसुलातही वाढ होत आहे. दैनंदिन महसूल 50 लाखावर येऊन पोहोचला आहे. परिवहनसाठी ही बाब समाधानकारक असली तरी इंधन दरवाढीचा
मात्र फटका सहन करावा लागत आहे. बसस्थानकातून ग्रामीण बससेवेबरोबर वातानुकूलित बसेस देखील पूर्ण क्षमतेने धावत आहेत. प्रवाशांचा प्रतिसाद देखील मिळत असल्याने बसफेऱया वाढल्या आहेत. त्यामुळे उत्पन्नात वाढ होत आहे. सोमवारपासून नववी ते बारावीच्या ऑफलाईन वर्गांना प्रारंभ झाला आहे. त्यामुळे प्रवाशांच्या संख्येत आणखी वाढ झाली आहे. त्यामुळे महसूल वाढण्याची आशा परिवहनला आहे. मात्र वाढत्या इंधनामुळे परिवहन अडचणीत आले आहे. आधीच कोरोनामुळे परिवहनच्या तिजोरीत ठणठणाट निर्माण झाला आहे. त्यातच इंधन दरवाढीची भर पडल्याने याचा बससेवेवरदेखील परिणाम होत आहे.









