प्रतिनिधी / सातारा :
केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेल उत्पादन कर कमी करून ग्राहकांना दिलासा दिल्यामुळे आता राज्य सरकारनेही पेट्रोल-डिझेल वरील व्हॅट व अन्य कर कमी करुन इंधन दरवाढ कमी करावी या मागणीसाठी सातारा जिल्हा भाजपातर्फे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या नेतृत्वाखाली साताऱ्यातील पोवईनाका येथे आंदोलन करण्यात आले. तसेच या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पेट्रोल व डिझेलवरील करात अनुक्रमे पाच व दहा रुपयांनी कपात केली आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने केंद्र सरकारचे अनुकरण करत व्हॅट व अन्य करत कपात करून जनतेला दिलासा दिला पाहिजे. इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करताना केंद्र सरकारला दुषणे देणाऱ्या महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांनी राज्य सरकारच्या करात कपात करण्यासाठी अजून हालचाली केल्याचे दिसले नाही. यावरून आघाडी सरकारमधील घटक पक्षांचे आंदोलन हे केवळ ढोंग होते असेच सिद्ध होते.
भारतीय जनता पार्टीची सत्ता असलेल्या राज्य सरकारांनी करात तातडीने कपात केली आहे. देशातील 22 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी आपल्या करात कपात करून पेट्रोल डिझेलच्या दरात जनतेला आणखी सवलत दिली आहे. महाविकास आघाडी सरकारनेही आपल्या करात कपात करावी, असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
आंदोलनात भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्ष सुवर्णा पाटील, शहराध्यक्ष विकास गोसावी, तालुका अध्यक्ष राजेंद्र इंगळे, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, जिल्हा उपाध्यक्ष ऍड प्रशांत खामकर, राहुल शिवनामे, चिटणीस विजय गाढवे, सातारा शहर सरचिटणीस प्रविण शहाणे आदी सहभागी झाले होते.









