नवी दिल्ली / वृत्तसंस्था
शीना बोरा हत्याकांडप्रकरणी तुरुंगात असलेल्या इंद्राणी मुखर्जीला सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे. इंद्राणी गेल्या 6 वर्षांहून अधिक काळ तुरुंगात असल्याने न्यायालयाने तिची सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच खटला लवकर पूर्ण होणार नसल्याचे न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने सांगितले. यापूर्वी इंद्राणी मुखर्जीला मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मिळू शकला नव्हता. इंद्राणी मुखर्जीला ऑगस्ट 2015 मध्ये अटक करण्यात आली होती. सध्या ती मुंबईतील भायखळा महिला कारागृहात बंद आहे.
सीबीआयच्या विशेष न्यायालयानेही इंद्राणीला जामीन नाकारला होता. इंद्राणी मुखर्जी हिची मुलगी शीना हिच्या हत्येप्रकरणी 24 एप्रिल 2012 पासून खटला सुरू आहे. सीबीआय 2012 पासून या प्रकरणाचा तपास करत आहे. इंद्राणीने शीनाचा गळा आवळून खून करून मृतदेह रायगड जिह्यातील जंगलात पुरल्याचा आरोप आहे. त्यांना शीना बोराचे अवशेषही सापडल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला आहे. या प्रकरणात पीटर मुखर्जी यांनाही कटाचा भाग असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. फेब्रुवारी 2020 मध्ये उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.









