इंदोर / वृत्तसंस्था :
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीची 5 दिवसीय बैठक गुरुवारी इंदोर सुरू झाली आहे. या बैठकीत सरसंघचालक मोहन भागवत हे देखील सामील झाले आहेत. ग्रामीण भाग तसेच पश्चिम बंगालमधील शाखांच्या विस्तारावर संघाचा भर राहणार आहे. पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. प्रचारमोहिमेची धुरा सांभाळण्यासाठी भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी तयारीस प्रारंभ केला आहे.
वर्तमान राजकीय स्थिती पाहता संघाची बैठक महत्त्वाची मानली जात आह. इंदोर हे संघाच्या मालवा प्रांताचे मुख्यालय असल्याने ही बैठक तेथे आयोजित होत आहे. पहिल्या 3 दिवसांमध्ये अखिल भारतीय कार्यकारिणीची बैठक पार पडणार आहे. तर एक दिवस सर्व 56 संलग्न संघटनांच्या सर्वोच्च पदाधिकारी राष्ट्रीय नेतृत्वासोबत चर्चा करतील. मध्यक्षेत्राच्या विभाग प्रचारकांच्या बैठकीचेही एक सत्र असणार आहे.
दिग्गजांचा सहभाग
बैठकीच्या अंतिम टप्प्यात भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जयप्रकाश नड्डा, कैलास विजयवर्गीय, बी.एल. संतोष, राम माधव, पी. मुरलीधर राव, अनिल जैन, डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, भूपेंद्र यादव, व्ही. सतीश, शिवप्रकाश, सौदान सिंग, थावरचंद गेहलोत, नरेंद्रसिंग तोमर, प्रल्हाद पटेल, प्रकाश जावडेकर यांच्या सहभागाची शक्यता आहे.
3 मुद्दय़ांवर भर
सरसंघचालक भागवत हे बुद्धिवंतांशीही संवाद साधणार आहेत. नागरिकत्व सुधारणा कायद्यावर संघाच्या जागरुकता मोहिमेवर प्रदीर्घ चर्चा होणार आहे. स्वयंसेवकांची भूमिका निर्धारित करण्यात येणार आहे. ग्रामीण भागांमध्ये संघाच्या शाखांचा विस्तार होण्यासंबंधी मंथन होणार आहे. गावांमध्ये संघाचा प्रभाव वाढत असल्याने तेथील शाखा वाढविण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. हरियाणा, झारखंड समवेत अन्य ठिकाणच्या निवडणुकीत भाजपचे बळ घटले आहे. चालू वर्षात दिल्ली, बिहारमध्ये निवडणूक होणार आहे. तर पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी महत्त्वाची पावले उचलली जाणार आहेत.









