प्रतिनिधी / सोलापूर
स्मार्ट सिटी अंतर्गत इंदिरा गांधी स्टेडियमचे पहिल्या टप्प्यात 7 कोटी रूपये खर्च करून नुतनीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये क्रिकेटबरोबरच इतर खेळांसाठी व खेळाडूंसाठी सुसज्ज सोयी-सुविधा देण्यात येतील. सध्या महिला क्रिकेटला चांगला दर्जा मिळाला आहे. हे स्टेडियम भारतातील सर्वात मोठय़ा मैदानापैकी एक मैदान आहे. या सर्वांचा विचार करून इंदिरा गांधी स्टेडियमला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करून देणार असल्याचे मत भारताचे माजी क्रिकेट प्रशिक्षक लालचंद रजपूत यांनी व्यक्त केले.
स्मार्ट सिटी अंतर्गत इंदिरा गांधी स्टेडियमवर स्टेडियमच्या नुतनीकरणाचे उद्घाटन महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या हस्ते कुदळ मारून शुक्रवारी, 7 फेब्रुवारी रोजी झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी आयुक्त डॉ. दीपक तावरे, उपमहापौर राजेश काळे, सभागृहनेते श्रीनिवास करली, काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे, आनंद चंदनशिवे, किसन जाधव, नगरसेविका वंदना गायकवाड, रामेश्वरी बिर्रु, श्रीदेवी फुलारे, प्रतिभा मुदगल, राजेश्री चव्हाण, नगरअभियंता संदीप कारंजे, स्मार्ट सिटीचे अधिकारी तपन डंके, श्रीनिवास पुरुड, उद्योजक केतन शहा आदींची प्रमुख उपस्थिती होती.
लालचंद रजपूत पुढे म्हणाले, शहराच्या मध्यवर्ती भागात इतके मोठे मैदान क्वचितच असेल. सर्वसाधारणपणे 62 ते 65 यार्डचे मैदान असते. परंतु आपल्या या स्टेडियमला 72 यार्डची बॉण्ड्री असल्याचे ऐकून नवल वाटले. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमपेक्षाही हे स्टेडियम मोठे आहे.
आयुक्त डॉ. दीपक तावरे यांनी मैदानाच्या नुतनीकरणामध्ये आधुनिक तंत्राचा वापर केला जाणार आहे. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी मैदानाच्या खालून ड्रेनेज सिस्टीम, या मैदानावर इतर तब्बल अकरा पिच आणि सरावासाठी पुन्हा वेगळे आठ पिच बनवण्यात येणार आहेत. तसेच नुतनीकरणाचे काम पुण्याच्या मे. कृष्णा इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. या कंपनीस देण्यात आले असून येत्या नऊ महिन्यात काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे तावरे यांनी सांगितले.









