नवी दिल्ली/प्रतिनिधी
१९७५ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी लावलेली आणीबाणी ही चूक होती, असं मोठं वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलं आहे. अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठातील प्राध्यापक कौशिक बासू यांच्याशी ते बोलत होते. यावेळी राहुल गांधींनी आणीबाणी, भाजप, राष्ट्रीस स्वयंसेवक संघ, काँग्रेस अध्यक्षपद या सर्व मुद्द्यांवर भाष्य केलं. राहुल गांधी यांनी आणीबाणी चुकीची होती सांगताना सध्या देशात जे सुरु आहे ते आणीबाणीपेक्षा वेगळं आहे अशी टीका केंद्र सरकारवर केली.
आणीबाणीबाबत जेव्हा राहुल गांधींना विचारण्यात आलं, तेव्हा ते थेट म्हणाले, की आणीबाणी ही इंदिरा गांधींची चूक होती, त्यावेळी जे घडलं, ते घडायला नको होतं, मात्र त्यावेळी जे घडलं आणि आता जे घडत आहे, त्यात फरक आहे. काँग्रेसने कधीच देशाची संस्थानात्मक चौकट मोडण्याचा प्रयत्न केला नाही, असे राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधी म्हणाले आम्हाला संसदेत बोलू दिलं जात नाही. न्यायव्यवस्थेकडून आता काही आशा नाही. संघ आणि भाजपकडे आर्थिक ताकद आहे. मणिपूरमध्ये राज्यपाल भाजपची मदत करत आहेत. पुद्दूचेरीमध्ये उपराज्यपालांनी अनेक विधेयकं मंजूर केली नाहीत, कारण ते संघाच्या जवळचे आहेत. काँग्रेसने कधीच अशाप्रकारे संस्थानांचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र मोदी सरकार लोकशाहीलाच धक्का देतेय.









