कोरोनाचा बांधकाम क्षेत्रावरही मोठा परिणाम : पावसाळय़ापूर्वी कामे होणे मुश्कील
प्रतिनिधी/ कणकवली
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वात मोठा परिणाम बांधकाम क्षेत्रावर झाल्याचे दिसत आहे. शहरी भागातील मोठमोठय़ा कॉम्प्लेक्ससह गावात इंदिरा आवास तसेच वैयक्तिक पातळीवर बांधण्यात येणारी घरांची कामेही ‘लॉकडाऊन’ झाली आहेत. लॉकडाऊन उठल्यानंतर पुढील काळात पावसाळय़ापूर्वी ही कामे पूर्ण होण्याची शक्यताही फारच कमी आहे.
कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा बंद आहेत. 144 कलम लागू असल्याने पाचपेक्षा अधिक जणांना एकत्रित येण्यासही बंदी आहे. याचा मोठा परिणाम बांधकाम क्षेत्रावर झाल्याचे दिसत आहे. शहर पातळीवर अनेक ठिकाणी सुरू असलेल्या कॉम्प्लेक्ससह मोठय़ा बांधकामांवर परप्रांतीय कामगार मोठय़ा संख्येने कार्यरत असतात. मात्र, सद्यस्थितीत लॉकडाऊनमुळे ही कामे बंद झाली असून कामे बंद असल्याने कामगारही अडचणीत सापडले आहेत.
दुसरीकडे गावपातळीवर इंदिरा आवास वा इतर योजनांमधून होणारी घरांची कामे तसेच वैयक्तिक पातळीवरील घरांची कामेही लॉकडाऊन झाली आहेत. गावपातळीवर तीन-चार कामगार सुरक्षित अंतर राखून ही कामे करू शकले असते, तरीही त्यासाठी आवश्यक सिमेंट, चिरे, वाळू वा तत्सम साहित्य उपलब्ध नाही. लॉकडाऊनमुळे हे सर्व बंद झालेले आहे. अशास्थितीत गावपातळीवरील सर्व बांधकामेही लॉकडाऊन झाल्याचे दिसत आहे. काही ठिकाणी तर नागरिकांनी राहती घरे बांधकाम करण्यास घेतलेली आहेत. ही बांधकामे पावसाळय़ापूर्वी म्हणजे मे महिन्यापर्यंत तरी पूर्ण व्हावीत, अशी अपेक्षा असते. मात्र, आता 14 एप्रिलपर्यंतचे लॉकडाऊन व नंतरची पुढील स्थिती काय असेल, यावर बरेच काही अवलंबून आहे. त्यामुळे बांधकामे लॉकडाऊन झाल्याची स्थिती आज दिसत आहे.









