आशिया चषक पुरुष हॉकी स्पर्धा ः जपानने पाकिस्तानला नमवण्याची गरज
जकार्ता / वृत्तसंस्था
विद्यमान विजेता भारतीय हॉकी संघ आशिया चषक पुरुष हॉकी स्पर्धेच्या बाद फेरीत पोहोचण्यासाठी आज (गुरुवार दि. 26) इंडोनेशियाविरुद्ध मोठा विजय मिळवण्यासाठी प्रयत्नशील असेल. इंडोनेशियाला मोठय़ा फरकाने नमवण्याबरोबरच जपानने पाकिस्तानला नमवणे देखील भारतासाठी महत्त्वाचे असणार आहे.
भारतीय संघ आपल्यापेक्षा खालील स्थानावर असलेल्या इंडोनशियाला नमवण्याची क्षमता राखून आहे. पण, बाद फेरीतील स्थान निश्चितीसाठी भारताला जपान-पाकिस्तान लढतीवर अवलंबून रहावे लागणार आहे. एक बरोबरी व एक पराभव अशा कामगिरीसह भारतीय संघ अ गटात तिसऱया स्थानी आहे. जपान 6 गुणांसह पहिल्या तर पाकिस्तान 4 गुणांसह दुसऱया स्थानी आहे.
सरदार सिंग यांच्या मार्गदर्शनाखालील भारतीय संघाने या स्पर्धेत बिरेंद्र लाक्रा व एसव्ही सुनील या अनुभवी खेळाडूंना समाविष्ट केले असले तरी युवा खेळाडूंवर त्यांचा अधिक भर राहिला आहे. लाक्रा व एसव्ही सुनील यांनी निवृत्ती मागे घेत पुन्हा मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. मात्र, एक-दोन सामन्यात सूर सापडणार का, यावरच त्यांची उर्वरित कारकिर्दीतील वाटचाल अवलंबून असणार आहे.
या स्पर्धेत भारताला पाकिस्तानविरुद्ध शेवटच्या मिनिटाला गोल पत्करावा लागल्यानंतर 1-1 अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले. त्यापूर्वी जपानने सलामी लढतीत भारताचा 5-2 फरकाने धुव्वा उडवला. भारताचा गोल डिफरन्स -3 असा असून ही देखील कमकुवत बाजू आहे. भारताने या स्पर्धेसाठी युवा खेळाडूंवर भर दिला असला तरी त्यांचा अननुभव फटका देणारा ठरला. डिफेन्स, मिडफिल्ड व फॉरवर्ड लाईन या तिन्ही आघाडय़ांमध्ये भारतीय संघ दुबळा असल्याचे या स्पर्धेत अधोरेखित होत आले आहे.
अनुभवी लाक्रा बॅकलाईनवर निष्प्रभ ठरत आला असून टोकियो ऑलिम्पियन सिमरनजीत सिंग, युवा स्टार उत्तम सिंगला सूर सापडत नसल्याने फॉरवर्ड लाईनकडून देखील भारताची निराशा झाली आहे. केवळ पवन राजभरने थोडीफार चमक दाखवली असून पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर करण्यातील अपयश ही देखील भारतीय संघाची आणखी एक चिंता ठरत आहे. अनुभवी रुपिंदर पाल सिंगने मनगटाच्या दुखापतीमुळे शेवटच्या क्षणी माघार घेतल्याने संघाकडे एकही अव्वल दर्जाचा ड्रग-फ्लिकर नाही, ही वस्तुस्थिती आहे.









