जागतिक क्रमवारीतील सहावी मानांकित ग्रेसिया पोलि व ऍप्रिएनी रहायू या इंडोनेशियाच्या जोडीने ऑलिम्पिक बॅडमिंटनमधील महिला दुहेरीचे सुवर्ण जिंकले. त्यांनी अमेरिकेच्या चेन क्विंग चेन व जिया यि फॅन या जोडीला 21-19, 21-15 अशा सरळ गेम्समध्ये पराभवाचा धक्का दिला. जवळपास पूर्ण रिकाम्या असलेल्या मुकाशिनो फॉरेस्ट स्पोर्ट प्लाझावर ही लढत खेळवली गेली.
या अंतिम लढतीत पोलिने एकवेळ शटलकॉक इतक्या जोरात मारली होती की, रॅकेटलाही तडा गेला. इथे तिला रॅकेट बदलावी लागली आणि नव्याने खेळाला सुरुवात करावी लागली. इंडोनेशियाने महिला दुहेरीत यापूर्वी कधीच सुवर्ण जिंकले नव्हते. ही केवळ चीनची मक्तेदारी ठरत आली. येथे मात्र हे समीकरण बदलले गेले. ‘आम्ही जिंकू शकणार नाही. कारण, इंडोनेशियाला या इव्हेंटमध्ये यापूर्वी एकदाही सुवर्ण जिंकता आलेले नाही, असे लोक म्हणायचे. पण, आम्ही त्याकडे दुर्लक्ष करत ध्येयाच्या दिशेने वाटचाल कायम राखली आणि आता आम्ही सुवर्णपदकाचे मानकरी ठरलो आहोत’, असे आनंदाश्रू आवरत 33 वर्षीय पोलि म्हणाली.
विजेतेपदावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर पोलि व रहायू यांनी एकमेकांना आलिंगन देत या विजयाचा आनंद साजरा केला. राष्ट्रगीत सुरु झाल्यानंतर व इंडोनेशियाचा ध्वज फडकत असताना मात्र या दोघींना आनंदाश्रू अनावर झाले.
दक्षिण कोरियन्सना महिला दुहेरीचे कांस्य
तत्पूर्वी, महिला दुहेरीच्या या गटात 2 दक्षिण कोरियन संघ कांस्यपदकाच्या प्ले-ऑफ लढतीत आमनेसामने भिडले. जागतिक क्रमवारीतील पाचव्या मानांकित किम सोयेआँग व काँग हियाँग यात विजेते ठरले. या जोडीने ली सोही व शिन सेऊंगचन यांना 21-10, 21-17 अशा फरकाने मात दिली.