800 हून अधिक जखमी, मालमत्तेची मोठी हानी
जकार्ता / वृत्तसंस्था
इंडोनेशियाच्या जावा बेटाला भूकंपाचे धक्के बसले असून आतापर्यंत त्यात 56 जणांचा बळी गेला आहे. घरे, कार्यालये आणि इतर स्थावर आस्थापनांची प्रचंड हानी झाली असून अनेक जण बेघर झाले आहेत. काही भागांमधील वीजपुरवठा खंडित झाला असून साहाय्यता कार्याला प्रारंभ झाला आहे. या भूकंपात 800 हून अधिक जण जखमी झाले असून मृतांची संख्या वाढविण्याची भीती व्यक्त होत आहे. अद्याप हानीचे अचूक प्रमाण समजलेले नाही.
पश्चिम जावामधील सियांजर येथे या भूकंपाचे केंद्र होते. भूकंपाची तीव्रता रिष्टर प्रमाणानुसार 5.6 इतकी होती. मात्र, तो मानववस्तीजवळ झाल्याने त्याची तीव्रता अधिक जाणवली, अशी माहिती देण्यात आली. या प्रदेशातील रुग्णालये जखमींनी भरुन गेलेली असून वैद्यकीय व्यवस्थेवर मोठा ताण पडत आहे, असे स्थानिक प्रशासनाचे म्हणणे आहे. इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथून विशेष साहाय्यता दले पाठविण्यात आली आहेत. पश्चिम जावा भागातील हजारो घरे या भूकंपात उद्धवस्त झाली असून लोक त्यांच्या घरांमधून वेळीच बाहेर पडल्याने जिवीत हानी मोठय़ा प्रमाणावर टळली आहे. भूकंपाच्या मुख्य धक्क्यानंतर एक तासाच्या कालावधीत आणखी अनेक छोटे धक्के बसले. नागरीकांमध्ये घबराट पसरली असून हजारो लोक सरकारी साहाय्याच्या प्रतीक्षेत उघडय़ावर बसून आहेत, अशी माहिती स्थानावर असणाऱया अनेक पत्रकारांनी आणि मिडियाने दिली आहे.

ढिगाऱयांखाली अनेकजण
दुपारी 2 च्या आसपास बसलेल्या या धक्क्याने अनेक घरे आणि इमारती यांचे ढिगाऱयात रुपांतर झाले. या ढिगाऱयांखाली अनेकजण अद्यापही अडकलेले असल्याची शक्यता व्यक्त होत असून यंत्रांच्या साहाय्याने ढिगारे उपसण्याचे कार्य सुरु करण्यात आले. आतापर्यंत 35 जणांचे जीव वाजविण्यात यश आले आहे. खेडय़ांमध्येही घरांची मोठी हानी झाली. तेथील मृत आणि जखमींची संख्या अद्याप स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे मृतांची संख्या वाढू शकते अशी चिंता पश्चिम जावाचे स्थानिक प्रशासकीय व्यवस्थापक हर्मन सुहेरमन यांनी स्पष्ट केले.
तातडीच्या उपचारांवर भर
गंभीर जखमी रुग्णांना तातडीचे साहाय्य पुरविण्यावर भर देण्यात येत असून प्रशासनाने आपली सर्व वैद्यकीय सेवा याकामी लावली आहे. ग्रामीण भागांमध्ये अद्याप अनेक कुटुंबांची सुटका करण्यात आलेली नाही. तेथे आहार आणि औषधे यांचे साहाय्य पुरविण्यात येत आहे. देशाचे आपदा साहाय्यता अधिकारी सुहार्यांतो स्वतः साहाय्यता कार्यावर लक्ष ठेवत असून ग्रामीण भागांकडे साहाय्यता पाठविण्यास प्रारंभ करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
पर्यावरण विभागाकडून इशारा
या भूकंपानंतर चोवीस तासांनी आणखी धक्के बसण्याची शक्यता असून नागरीकांनी सावध रहावे, असा इशारा इंडोनेशियाच्या हवामान विभागाने दिला. आपदाग्रस्त लोकांना पाण्याच्या बाटल्या आणि अन्नाची पाकिटे पुरविली जात असून सरकारी साहाय्याता पोहचेपर्यंत जागा न सोडण्याचा आदेश देण्यात आला असून औषधांचा तुटवडा पडत असल्याची तक्रार रुग्णांकडून होत आहे.
इंडोनेशिया भूकंपप्रवण
संपूर्ण इंडोनेशिया देश भूकंपप्रवण असून तेथे नेहमीच छोटे मोठे भूकंप नेहमी होतात. विषुववृत्ताच्या रिंग ऑफ फायर भागात हा देश आहे. गेल्या 20 वर्षांमध्ये आठ मोठे भूकंप झाले असून सहा हजारांहून अधिक बळी गेले आहेत. या देशात चार जीवंत ज्वालामुखी असून भूकंप झाल्यानंतर त्यांचा स्फोट होण्याची शक्यता असते. त्यामुळे ज्वालामुखींच्या प्रदेशांमध्ये अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. जानेवारीत 6.2 क्षमतेच्या भूकंपामुळे सुलावेसी बेटांवर मोठा नाश झाला होता. त्या भूकंपात 100 हून अधिक लोकांचा बळी गेला होता, अशी माहिती देण्यात आली.









