डोनाल्ड ट्रम्प यांचे गौरवोद्गार : भारतावर स्तुतिसुमनांचा वर्षाव, दहशतवादावरून पाकिस्तानला फटकार
अहमदाबाद, नवी दिल्ली / वृत्तसंस्था
प्रथमच भारत दौऱयावर आलेल्या अमेरिकेन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सोमवारी भारतात भव्य दिव्य स्वागत करण्यात आले. जगातील सर्वात मोठय़ा मोटेरा क्रिकेट स्टेडियममध्ये आयोजित ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमात नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी मनोगत व्यक्त केले. भारतीय संस्कृतीचा लेखाजोखा मांडत ट्रम्प यांनी भारतीय व्यवस्थेवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यप्रणालीवर स्तुतिसुमने वाहिली. भारतासंबंधी प्रेमभावना व्यक्त करतानाच दुसरीकडे त्यांनी दहशतवादाच्या मुद्यावरून पाकिस्तानला कडक शब्दांत फटकारले.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱयाला सोमवारपासून प्रारंभ झाला. सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस विविध बैठका आणि कार्यक्रमांमध्ये ते व्यग्र असणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर त्यांची पत्नी मेलेनिया, मुलगी इवांका, जावई जेअर्ड कुशनर हे देखील आलेले आहेत. पंतप्रधान मोदींनी अहमदाबाद विमानतळावर त्यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांनी सर्वात प्रथम साबरमती आश्रमाला भेट दिली व त्यानंतर मोटेरा स्टेडियममधील ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी त्यांचे लाखो नागरिकांनी जोरदार स्वागत केले. हा कार्यक्रम आटोपून ट्रम्प आग्रा येथे ताजमहाल पाहण्यासाठी पोहोचले होते. ‘ताजमहाल’च्या सौंदर्यावरही ट्रम्प दाम्पत्य भाळल्याचे दिसून येत होते. ताजमहल आम्हाला प्रेरणा देतो, अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

…हा ऐतिहासिक क्षण : मोदी
मोटेरा स्टेडियमवरील कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी ट्रम्प दाम्पत्याचे स्वागत केले. ‘हा ऐतिहासिक क्षण आहे. आपण संस्मरणीय क्षणाचे साक्षीदार आहोत. पाच महिन्यांपूर्वी मी अमेरिका दौऱयाची सुरुवात हय़ुस्टनमधील ‘हाऊडी मोदी’ कार्यक्रमाने केली होती. आता माझे मित्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्या ऐतिहासिक भारत दौऱयाची सुरुवात ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमाने होत असल्याचे सुतोवाच करत स्वागत केले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या भाषणात भारतीय संस्कृतीसंबंधी प्रेम आणि आदराची भावना व्यक्त केली. तसेच पंतप्रधान मोदींच्या कार्याचे कौतुक करत इतर देशांच्या तुलनेत भारत वेगाने प्रगती साधत असल्याचे स्पष्ट केले. त्याचबरोबर दहशतवादाच्या मुद्यावरून अमेरिका आणि भारत एकत्रितपणे काम करणार असल्याचे सुतोवाच करत पाकिस्तानला कडक शब्दात सूचक इशारा दिला आहे. आपले देश इस्लामिक दहशतवादाचे शिकार ठरले आहेत. या दहशतवादाविरोधात आपण लढत आहोत. अमेरिकेने कारवाई करत इराक आणि सीरियामधून ‘आयएस’ला संपवले. आम्ही अल बगदादीचा खात्मा केला. आम्ही दहशतवादाच्या विरोधात कडक कारवाई करत आहोत. पाकिस्तानवरही दबाव टाकला आहे. पाकिस्तानला दहशतवादाच्या विरोधात कारवाई करावीच लागेल, अशी सक्त ताकीद देताना प्रत्येक देशाला स्वतःला सुरक्षित करण्याचा अधिकार असल्याचा निर्वाळाही दिला.
हायलाईट्स…
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गळाभेट घेत ट्रम्प यांचे केले स्वागत
- साबरमती आश्रमातर्फे खादीचे उपरणे भेट देऊन ट्रम्प यांचा सन्मान
- बापूजींच्या कार्याविषयी नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांना दिली माहिती
- ट्रम्प यांनी जाणून घेतली चरख्यावर सूतकताई करण्याची माहिती
- मोटेरा स्टेडियमवरील कार्यक्रमात मोदी-ट्रम्प यांचे तीनवेळा आलिंगन
- भाषण सुरू असतानाच नरेंद्र मोदींनी ट्रम्प यांच्याशी केले हस्तांदोलन
- चांद्रयान मोहिमेचा उल्लेख करत भारताला सहकार्याचे आश्वासन
- महात्मा गांधींविषयी मनात आदरभाव असल्याची भावना व्यक्त
- उ. प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी केले ट्रम्प यांचे स्वागत
काय म्हणाले ट्रम्प…?
- अमेरिका भारताशी द्विपक्षीय चर्चा करून अनेक करारांना मूर्त स्वरुप देईल
- अमेरिका भारताला सर्वात खतरनाक अशी क्षेपणास्त्र आणि हत्यारे पुरविणार
- अमेरिका आणि भारत दोघेही दहशतवादाच्या विरोधात एकत्रितपणे लढणार
- भारतातील हिंदू, जैन, मुस्लीम, शीख अशा अनेक धर्मांची एकता प्रेरणादायी
- भारत-अमेरिका आज मैत्रीसोबतच व्यापारामध्येही आघाडी घेण्याच्या मार्गावर
- मोदी हे केवळ गुजरातचे नाही तर मेहनत, नि÷ा यांचे मूर्तीमंत प्रतीक आहे
- भारताची लोकशाही विलक्षण आहे. मोदींमध्ये अतुलनीय कर्तबगारी आहे
- भारतात 100 हून अधिक भाषा बोलल्या जातात तरीही भारतात एकी आहे
- “ताजमहल आम्हाला प्रेरणा देतो. भारतीय संस्कृतीच्या संपन्न व वैविध्यपूर्ण सौंदर्याचे ते कालातीत प्रतीक आहे. धन्यवाद भारत.’’









